Join us

अफगाणिस्तानच्या गुरबाजवर टायटन्सची नजर

दीर्घ कालावधीपर्यंत बायो-बबलमध्ये राहणे कठीण असल्याचे सांगत रॉयने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. त्याच्या जागी आता गुजरात संघाने अफगाणिस्तानच्या गुरबाजला आपल्या संघात स्थान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 05:57 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या सत्राला सुरुवात होण्याच्या काही आठवडे अगोदर इंग्लंडचा धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज जेसन रॉय याने बायो-बबलमध्ये राहावे लागणार असल्याचे कारण देत माघार घेतली. यामुळे गुजराज टायटन्स संघाला मोठा धक्का बसला. मात्र, आता त्याच्या जागी अफगाणिस्तानचा आक्रमक सलामीवीर रहमामुल्लाह गुरबाज याची वर्णी लागू शकते. 

दीर्घ कालावधीपर्यंत बायो-बबलमध्ये राहणे कठीण असल्याचे सांगत रॉयने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. त्याच्या जागी आता गुजरात संघाने अफगाणिस्तानच्या गुरबाजला आपल्या संघात स्थान दिले आहे. सलामीवीर गुरबाजने अनेक सामन्यांत आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर प्रभावी कामगिरी केली आहे. टी-२० मध्ये १५० हून अधिकचा स्ट्राइक रेट राखलेल्या गुरबाजने आतापर्यंत ६९ टी-२० सामन्यांत ११३ षटकार ठोकले आहेत. पर्यायी खेळाडू म्हणून गुरबाजचा संघात समावेश करून घेण्यासाठी गुजरात संघ बीसीसीआयच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरबाजच्या निवडीसाठी संघाचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानने सल्ला दिला आहे. 

गुरबाजमुळे दूर होणार अडचणआधीच रॉयने माघार घेतली असताना ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यात संघासोबत जुळणार आहे. अशा परिस्थितीत संघाकडे यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहाचा पर्याय असून त्याचा टी-२० रेकॉर्ड फारसा चांगला नाही. गुरबाजने पाकिस्तान सुपर लीग, लंका प्रीमियर लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.

Open in App