आपल्या ओघवत्या शैलीतील लिखाणामधून आणि खुमासदार विश्लेषणामधून द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांनी क्रिकेटप्रेमींमध्ये आपला खास असा वाचकवर्ग निर्माण करणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. मागच्या काही काळापासून ते कर्करोगाशी मोठ्या धैर्याने झुंजत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१५ नोव्हेंबर १९५० रोजी जन्मलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांनी मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून काम करत असतानाच क्रिकेट समीक्षणाच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रातील क्रिकेटविश्वामध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांनी भारताने जिंकलेल्या १९८३ मधील क्रिकेट विश्वचषकापासून बहुतांश विश्वचषक स्पर्धांचं वार्तांकन केलं होतं. जुन्या काळातील क्रिकेट, माजी क्रिकेटपटूंसोबतचे अनुभव, गाजलेले सामने आणि ऐतिहासिक खेळी यांचे किस्से ते अगदी रंजक पद्धतीने वाचक आणि प्रेक्षकांसमोर मांडत असत. मुंबईतील क्रिकेट आणि मुंबईकर क्रिकेटपटू यांच्याबाबत त्यांना विशेष आत्मियता होती. त्याविषयी ते तळमळीने व्यक्त होत असत.
द्वारकानाथ संझगिरी यांनी काही सहकाऱ्यांसोबत एकच षटकार नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. तसेच त्या पाक्षिकामध्ये त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिलं होतं. एवढंच नाही तर मराठीतील विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी क्रिकेट सामन्यांवरील समीक्षणात्मक लेखन केलं होतं. तसेच द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटसह चित्रपट आणि प्रवासासह विविध विषयांवर सुमारे ४० हून अधिक पुस्तकांचं लिखाण केलं होतं.
याशिवाय द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट संबंधिक एकपात्री टॉक शो, माजी क्रिकेटपटू आणि महत्त्वाच्या स्पर्धांमधील विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे सत्कार सोहळे आदी कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन केलं होतं. तसेच काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या मधू इथे आणि चंद्र तिथे या दूरचित्रवाणीवरील धमाल विनोदी मालिकेचं पटकथा लेखनही संझगिरी यांनी केलं होतं.
मागच्या काही वर्षांपासून द्वारकानाथ संझगिरी हे कर्करोगाशी झुंजत होते. मात्र याही परिस्थितीही आजारपणाच्या वेदनांवर मात करत ते क्रिकेटसंबंधित लिखाण करत होते. मागच्या महिन्यात झालेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेपर्यंत त्यांनी क्रिकेट सामन्यांचं समीक्षण केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.