मुंबई क्रिकेटचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. १६ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. यानंतर रेगे यांना हार्ट अटॅक आला. यामुळे त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. १९७० च्या दशकाच्या मध्यात रेगे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा ते अवघे २६ वर्षांचे होते. त्यातून बरे होत त्यांनी १९७७-७८ ला मुंबई रणजी संघाचे पुन्हा नेतृत्व केले होते. यानंतर त्यांची कारकीर्द संपली असली तरी त्यांनी मुंबई क्रिकेटसाठी मोठे योगदान देणे सुरुच ठेवले होते.
१९८८ मध्ये मुंबई रणजी ट्रॉफी संघात किशोरवयीन सचिन तेंडुलकरला स्थान देण्याच्या निर्णयात रेगे यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांची शेवटची भूमिका मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे सल्लागार म्हणून बजावली होती. त्यांनी १९६६-६७ ते १९७७-७८ पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. फिरकी गोलंदाज म्हणून ५२ सामने खेळले आहेत. फलंदाजीमध्ये त्यांनी २३.५६ च्या सरासरीने १५३२ धावा ठोकल्या आहेत. तर गोलंदाज म्हणून २९.८३ च्या सरासरीने १२६ विकेट्स घेतल्या आहेत.
"मुंबई क्रिकेटमधील एक दिग्गज मिलिंद रेगे सर यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. खेळाडू, निवडकर्ता आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे योगदान अमूल्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाने क्रिकेटपटूंच्या पिढ्या घडवल्या आणि त्यांचा वारसा कायमचा जपला जाईल," असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.