ललित झांबरे
भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या मालिकेत वापरल्या जाणाऱ्या ड्युक्स चेंडूवरचे वादविवाद आणि त्यावर सुचवले जाणारे उपाय म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला’ असा प्रकार आहे. ड्युक्सच्या चेंडूंना गंभीर समस्या आहेत. त्यांचा आकार लवकर बिघडतोय. ते लवकर नरम पडताहेत. यावर सोपासरळ उपाय म्हणजे, ज्या चेंडूंबद्दल समस्या नाहीत, ते एसजी किंवा कुकाबुराचे चेंडू वापरले जावेत.
ड्युक्सचेच चेंडू वापरावे लागतील, असा कंपनीशी काही करार नाही. ड्युक्सचे मालक दिलीप जाजोदिया यांनी आपले चेंडू दर्जेदार असल्याचा दावा करताना स्वत: म्हटले की, ड्युक्सचेच चेंडू वापरावेत असे बंधन कुणावरही नसताना आमचे चेंडू सर्व स्तराच्या क्रिकेटमध्ये वापरले जात आहेत. मग ड्युक्सऐवजी एसजीचे चेंडू किंवा कुकाबुराचे चेंडू इंग्लंडमधील कसोटी सामन्यांसाठी वापरायला काही हरकत नाही.
ड्यूक चेंडू नरम का पडतो?सध्या कसोटीसाठी नियमानुसार ८० षटकांनंतर नवा चेंडू मिळतो. ड्युक्सच्या चेंडूंचा अनुभव असा आहे की, ८० षटके हा चेंडू टिकूच शकत नाही. ८० तर सोडा, पण लॉर्डस् कसोटीत तर भारताला दुसरा नवा चेंडू केवळ साडेदहा षटकांनंतरच बदलून मागण्याची वेळ आली. आकडेवारीनुसार, या मालिकेत साधारणत: दर ४० ते ४५ षटकाला चेंडू बदलावा लागतोय.
निर्मात्याचा वेगळाच तर्कजाजोदिया यांच्यानुसार, अगदी मोजक्याच कंपन्या चेंडू बनवितात. आपले चेंडू दर्जेदार आहेत म्हणूनच ते इतक्या वर्षांपासून सर्व स्तरांच्या क्रिकेटमध्ये वापरण्याचे कोणतेही बंधन नसताना वापरले जात आहेत. मशीनने नाही तर हाताने बनणारा प्रत्येक चेंडू वेगळा असतो; कारण चामडी वेगळी, कारागीर वेगळा तसा फरक पडतोच. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्रिकेटचे स्वरूप बदललेय. आक्रमक फटकेबाज फलंदाजीचे युग आहे. त्यानुसार बॅटसुद्धा वजनदार झाल्या आहेत. खेळाडू चौकार, षट्कारांची बरसात करत असतात. त्यामुळे सतत मार बसत असल्याने चेंडूमध्ये बदल होणारच आहे. ते टाळता येणारे नाही.
गोलंदाजांना विकेट मिळेनाशा झाल्या असल्याने ते चेंडूला दोष देऊ लागले असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, ८० षटकांनंतर नाही तर ६०-६५ षटकांनंतरच चेंडू बदलायला हवा, असा उपायही त्यांनी सुचवला आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांच्या बदलत्या स्वरूपाचा परिणाम चेंडूच्या टिकाऊपणावर होत असतो. ८० षटके टणक राहणारा चेंडू बनवला, तर खेळाडूंची बोटं आणि पाठ यांची वाटच लागेल, असा इशारासुद्धा जाजोदिया यांनी दिला आहे.ड्युक्सच्या निर्मात्यांचे हे म्हणणे वरकरणी पटणारे असले तरी इतर चेंडूंबाबत या समस्या का येत नाहीत? गेल्या ५-६ वर्षांपासून ही समस्या क्रिकेट संघांना जाणवत असली तरी ड्युक्स कंपनीने त्यावर उपाय का शोधलेले नाहीत? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. याचे उत्तर ड्युक्स व जाजोदिया यांनी देणे आवश्यक आहे.
२०२०पासून सातत्याने या चेंडूंबाबत लवकरच त्यांचा आकार बिघडत असल्याच्या आणि ते नरम पडत असल्याच्या तक्रारी आहेत.
मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी ते वापरलेच जात नाहीत. एवढेच नाही, तर इंग्लंड क्रिकेट मंडळाने काऊंटी चॅम्पियनशिपच्या चार फेऱ्यांच्या सामन्यांसाठी ड्युक्सऐवजी कुकाबुरा चेंडू वापरण्याचा घेतलेला निर्णय यासंदर्भात बोलका आहे. हाताने बनविण्यात येणाऱ्या ड्युक्सच्या चेंडूची शिलाई अधिक ठळक असते. त्यामुळे तो कुकाबुराच्या चेंडूपेक्षा अधिक स्विंग होतो. ही बाब सामान्य असली तरी चेंडूचा आकार केवळ १०-१२ षटकांतच बिघडावा हे मात्र असामान्य आहे आणि तोच सध्या चर्चेचा विषय ठरलाय.