Join us

वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द! आयसीसी, बीसीसीआयने नेमके कारण ठेवले गुलदस्त्यात

वनडे विश्वचषकाला गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 06:59 IST

Open in App

अहमदाबाद : वनडे विश्वचषकाला गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात होत आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. त्याआधी आयोजित होणारा उद्घाटन सोहळा मात्र अचानक रद्द करण्यात आल्याचे वृत्त धडकले आहे. हा सोहळा नेमका कुठल्या कारणास्तव रद्द करण्यात आला, याचे स्पष्टीकरण मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने दिलेले नाही.

 वृत्तानुसार, सहभागी दहा संघांचे कर्णधार बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे एकमेकांची भेट घेणार असून, विश्वचषकासह त्यांचे फोटोसेशन होईल. त्यानंतर एका लेझर शोचे आयोजन होईल. मात्र, उद्घाटन समारंभाबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. याआधी ४ ऑक्टोबर रोजी बॉलीवूड तडकासह विविधरंगी उद्घाटन करण्याचे नियोजित होते. या समारंभाला बॉलीवूड स्टार रणवीर सिंग, तमन्ना भाटिया, गायक अरिजित सिंग, श्रेया घोषाल आणि आशा भोसले हजेरी लावणार होते. हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजेपासून होणार होता.  अशीही चर्चा आहे की, हा सोहळा आता १९ ऑक्टोबर रोजी याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्याआधी आयोजित करण्यात येईल. याशिवाय १४ ऑक्टोबर रोजी याच मैदानावर होणाऱ्या भारत- पाकिस्तान सामन्याआधी एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

वादविवाद सुरूच...

२०२३ च्या वनडे विश्वचषकाआधी अनेक वाद होत आहेत. सर्वांत आधी वेळापत्रकावरून वाद झाला. त्यानंतर आयोजन स्थळांवरून वाद उद्भवला. वेळापत्रक आणि आयोजन स्थळांमध्ये त्यामुळे बदल झाले.  तिकीट घोटाळ्याचे वृत्तदेखील धडकले. या सर्वांवर तोडगा काढल्यानंतर उद्घाटन सोहळा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचे ऐकून चाहते लालबुंद झाले. रागावलेल्या चाहत्यांनी समाज माध्यमांवर बीसीसीआयवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डबीसीसीआय