भारतीय क्रिकेटचा नवा 'सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केवळ १७५ धावांची खेळीच नाही, तर त्याने यूथ वनडे क्रिकेटमधील अनेक जुने जागतिक विक्रम मोडीत काढत भारताचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे.
वैभव सूर्यवंशीने यूथ वनडे क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने अवघ्या २५ डावांमध्ये ११० षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशच्या जवाद अबरारच्या नावावर ३३ डावात ५५ षटकार आहेत. म्हणजेच वैभवने प्रतिस्पर्ध्यापेक्षा अगदी दुप्पट षटकार खेचले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्याने १५ षटकार मारून स्वतःचाच १४ षटकारांचा जुना विक्रम मोडला.
विजय जोल आणि ऋषभ पंतचे रेकॉर्ड्स मोडले
वैभवने आता अंडर-१९ वनडेमध्ये एकूण १४१२ धावा केल्या आहेत. यासह त्याने विजय जोलचा १४०४ धावांचा विक्रम मोडला असून तो भारताचा अव्वल फलंदाज बनला आहे. तर २०१६ मध्ये ऋषभ पंतने ३४९ धावांच्या डावात मोठी भूमिका बजावली होती. मात्र, आज वैभवच्या १७५ धावांच्या जोरावर भारताने ४११ धावा केल्या, जो अंडर-१९ प्लेऑफमधील सर्वोच्च स्कोअर ठरला आहे.
अंडर १९ वर्ल्डकप फायनलमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने २०२४ मध्ये २५३ धावा केल्या होत्या, जो फायनलमधील सर्वोच्च स्कोअर होता. भारताने आज तो रेकॉर्ड पूर्णपणे धुळीस मिळवला आहे.
विक्रमांचा पाऊस
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात १७५ धावा करणारा वैभव हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
वैभवने केवळ ७१ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या. त्याने इंग्लंडच्या बेन मेयसचा (९८ चेंडू) विक्रम मोडीत काढला.