Join us

'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन

आतापर्यंत चेन्नईने गुजरातविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. मात्र या तीनही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:19 IST

Open in App

आयपीएल २०२३ मधील आज पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्सविरुद्धचेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल तर पराभूत संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागेल. 

विशेष म्हणजे चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत गुजरात विरोधातील एकही सामना जिंकता आलेला नाही. आतापर्यंत चेन्नईने गुजरातविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. मात्र या तीनही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. त्यामुळे आज गुजरातवर मात करुन चेन्नई अंतिम फेरीत प्रवेश करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी यांची मैत्री जगजाहीर आहे. हार्दिक पांड्याने फ्रँचायझीच्या सोशल मीडियावर धोनीबद्दल बोलताना सांगितले की, आज मी जे काही करू शकलो त्यात धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला फक्त धोनीला खेळताना पाहून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, माझ्यासाठी माही माझा भाऊ, मित्र आहे. ज्याच्याशी मी विनोद करतो, मस्ती करत राहीन, मी इतर चाहत्यांप्रमाणे महेंद्रसिंग धोनीचा नेहमीच फॅन राहीन, धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर खर्‍या अर्थाने शैतान व्हावे लागेल, असं हार्दिक पांड्याने सांगितले. 

खेळपट्टीचे स्वरूप मंद

चेपॉकच्या खेळपट्टीचे मंद स्वरूप ओळखून धावा काढणे गुजरातसाठी आव्हान असेल.  पॉवर प्लेमध्ये दीपक चाहर तर डेथ ओव्हरमध्ये  मथिसा पथिराना यांचा मारा सामन्यात महत्त्वाचा असेल. अशावेळी हार्दिक आणि नेहरा यांना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याच्याकडून सल्ला घ्यावा लागेल. शनाकाला अष्टपैलू म्हणून संधी दिली जाईल, पण नाणेफेकीचा कौल पाहून डावखुरा फिरकीपटू साईकिशोर यालादेखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सआयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्या
Open in App