Join us

मुंबईचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय कठीण होता! माहेला जयवर्धनेची कबुली

हार्दिक बरीच वर्षे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. यात काहीच नवे नाही. तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहेच. हार्दिककडे अनुभवाच्या आधारे पुढे जाण्याची संधी असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:03 IST

Open in App

मुंबई : रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व बहाल करण्याचा निर्णय कठीण होता आणि तो भविष्याचा विचार करूनच घेण्यात आला. हा मुद्दा भावनात्मकदेखील असल्याची कबुली एमआयचे जागतिक क्रिकेट प्रमुख माहेला जयवर्धने यांनी दिली आहे.

पांड्या कर्णधार म्हणून मुंबई संघात पुनरागमन करीत असल्याने चाहत्यांनी संघावर कठोर टीकाही केली.  जिओ सिनेमाशी बोलताना जयवर्धने म्हणाले, “हा निर्णय  कठीण होता. तो भावनिकही होता. चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. मात्र संघाला असे निर्णय घ्यावे लागतात.’’अनेकदा चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून माहेला पुढे म्हणाले, ‘‘आम्ही नेहमी जेतेपदासाठी खेळत असल्याने परंपरा निर्माण करू इच्छितो. लोकांना वाटत असेल की भावनिकदृष्ट्या हा निर्णय योग्य नाही, मात्र आम्हाला हा निर्णय घ्यायचाच होता. 

हार्दिक बरीच वर्षे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. यात काहीच नवे नाही. तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहेच. हार्दिककडे अनुभवाच्या आधारे पुढे जाण्याची संधी असेल. 

“पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी रोहितचे संघात असणे गरजेचे ठरते. तो शानदार कर्णधार होता. मी रोहितसोबत जवळून काम केले. मुंबई संघासाठी त्याने मोठा वारसा निर्माण केला. सचिनने स्वत:कडील नेतृत्व दुसऱ्याकडे सोपविले. संघ त्यावेळी योग्य वाटचाल करीत होता. रोहितकडून हार्दिककडे नेतृत्व आल्यानंतर असेच घडणार आहे,’’ असे माहेला यांनी सांगितले.

टॅग्स :हार्दिक पांड्यारोहित शर्मा