सर्वांत मोठे स्वप्न वानखेडेवर साकार झाले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

Wankhede Stadium: ‘१९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले,’ असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:45 IST2025-01-20T05:44:34+5:302025-01-20T05:45:20+5:30

whatsapp join usJoin us
The biggest dream came true at Wankhede, Master Blaster Sachin Tendulkar expressed his feelings | सर्वांत मोठे स्वप्न वानखेडेवर साकार झाले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

सर्वांत मोठे स्वप्न वानखेडेवर साकार झाले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक
 मुंबई : ‘१९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले. त्यामुळे २०११ साली वानखेडे स्टेडियमवर पटकावलेले विश्वविजेतेपद माझ्यासाठी 
खूप विशेष आठवण आहे,’ असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने रविवारी वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सव दिमाखात साजरा  झाला. यावेळी, सचिनने या स्टेडियमविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई क्रिकेट संघटनेने यावेळी मुंबईसह भारतीय संघाचेही नेतृत्व केलेल्या सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, डायना एडुल्जी, सचिन, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर कर्णधारांचा विशेष सन्मान केला. आगामी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करत असलेला धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव मात्र या सोहळ्यास अनुपस्थित होता.सचिन तेंडुलकर याने म्हटले, ‘वानखेडे स्टेडियम मी वयाच्या दहाव्या वर्षी पाहिले होते. त्यावेळी मला  माझ्या साहित्य सहवासमधील मित्रांनी लपवून आणले होते. हे स्टेडियम पाहत्याक्षणी मी प्रभावित  झालो आणि तेव्हा येथे खेळण्याचे ठरविले होते. तिथून माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला. १९८३ सालच्या विश्वचषकाच्या विजयाने मी खूप प्रेरित झालो होतो. १९९६ साली भारतात आणि २००३ साली दक्षिण आफ्रिकेत विश्वविजेतेपद अगदी जवळ आले होते; पण अखेर हे स्वप्नही २०११ साली माझ्या घरी  वानखेडे स्टेडियमवरच पूर्ण झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण होता.’

सर्व कर्णधारांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार 
या शानदार सोहळ्यादरम्यान भारताचे नेतृत्व केलेल्या मुंबईकर खेळाडूंचा एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि एमसीएचे विद्यमान पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे आणि डायना एडुल्जी यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आगामी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यस्त असल्याने सूर्यकुमार यादवला या सोहळ्यात सहभागी होता आले नाही. त्याचप्रमाणे, या स्टेडियमचे शिल्पकार शेषराव वानखेडे यांच्या कन्या रामोला महाजनी आणि नात मुक्ता महाजनी, १९७४-७५ साली कार्यकारिणी सदस्य असलेले विलास गोडबोले, वानखेडे स्टेडियमचे वास्तुविशारद शशी प्रभू, एमसीएमध्ये गेल्या दीर्घकाळापासून कार्यरत असलेले सी. एस. नाईक, एमसीएचे माजी अध्यक्ष रवी सावंत आणि दिवंगत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या पत्नी मिनल काळे यांनाही सन्मानित करण्यात आले. 

आईने मला प्रत्यक्षात खेळताना कधीच पाहिले नव्हते. तिने मला प्रत्यक्षात खेळताना पाहावे, अशी माझी इच्छा होती. माझी ही इच्छाही येथेच माझ्या अखेरच्या कसोटी सामन्यात पूर्ण झाली. अखेरच्या षटकाच्या आधी स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर आईला दाखविण्यात आले होते. तिलाही तेव्हा माहीत नव्हते. तो क्षण मी मनापासून पाहिला. ही संस्मरणीय आठवण मला विसरता येणार नाही. - सचिन तेंडुलकर 

रंगारंग कार्यक्रम 
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी आपल्या दणकेबाज सादरीकरणाने संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडताना सोहळ्याची शानदार सुरुवात केली. 
सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यात रंग भरल्यानंतर अशा लेझर शोने वानखेडे स्टेडियम उजळून निघाले.  गायक-संगीतकार अजय व अतुल यांनी आपल्या धमाल गाण्यांनी उपस्थितांना आपल्या तालावर नाचविले. 

टपाल तिकीट अनावरण
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एमसीएच्या वतीने विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास सांगणाऱ्या विशेष कॉफी टेबल बुकचेही अनावरण एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार, विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

गावसकरांनी धरला ठेका
गेल्या वर्षी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्यासाठी एमसीएच्या वतीने केकही कापण्यात आला. 
यावेळी, सचिन तेंडुलकरने आपल्या आदर्श खेळाडूला केकचा घास भरवला. 
तसेच, यानंतर मुंबईच्या माजी दिग्गज क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी गावसकर यांना नृत्य करण्यास सांगितले. यावेळी, गावसकर यांनी शानदार ठेका धरत सर्वांचे मनोरंजनही केले. 

चॅम्पियन्सचा जल्लोषही येथेच करू : रोहित शर्मा
मुंबई : ‘टी-२० विश्वचषक विजेतेपदाचा जल्लोष चाहत्यांसोबत वानखेडे स्टेडियमवर साजरा करण्याचा आनंद अवर्णनीय होता. आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचाही जल्लोष येथे करण्याचा प्रयत्न करू,’ असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. रोहितच्या आगमनापासूनच वानखेडे स्टेडियमवर ‘मुंबईचा राजा....रोहित शर्मा’ असा जयघोष सुरू झाला. त्याला जेव्हा आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले, तेव्हा चाहत्यांनी काही सेकंद जबरदस्त कल्ल करत संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडले.
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यादरम्यान रोहितने म्हटले की, ‘टी-२० विश्वविजेतेपदाचा जल्लोष आम्हाला चाहत्यांसोबत साजरा करायचा होता. लहानपणापासून येथे खेळण्याचे स्वप्न आम्ही पाहिले. येथे कोणताही सामना खेळताना चाहत्यांनी कायम प्रोत्साहित केले. त्यामुळेच, येथे खेळण्याचा नेहमीच विशेष आनंद असतो. यासाठी येथे टी-२० विश्वविजेतेपद घेऊन येण्याची माझी इच्छा होती.’

स्टेडियम खचाखच भरले होेते...
रोहितने पुढे सांगितले की, ‘याआधी २००७ सालचा टी-२० विश्वविजेतेपद येथे आणण्याचा आनंद अनुभवलेला होतो. तेव्हा मी नवखा होतो. पण, यावेळी मला स्वत:हून हा चषक आणायचा होता.
२००७ साली अनुभवलेला रोमांचक प्रसंग पुन्हा एकदा अनुभवायचा होता. आम्ही दिल्लीहून येथे येईपर्यंत संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. तो दिवस आणि चाहत्यांचा तो उत्साह कधीच विसरता येणार नाही.’
यानंतर रोहितने, आता  चॅम्पियन्स ट्रॉफीही वानखेडे स्टेडियममध्ये आणण्याचा प्रयत्न करु,’ असे म्हणताच उपस्थितांनी जोरदार जल्लोष केला. तसेच, रोहितच्या जयघोषाने संपूर्ण स्टेडियम दुमदुमले.

Web Title: The biggest dream came true at Wankhede, Master Blaster Sachin Tendulkar expressed his feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.