Join us

तो प्रश्नच चुकीचा होता! गावसकर यांनी मागितली वॉर्नवरील वक्तव्याची माफी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी अचानकपणे निधन झाले. संपूर्ण क्रिकेटविश्व यामुळे दु:खात ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 05:50 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी अचानकपणे निधन झाले. संपूर्ण क्रिकेटविश्व यामुळे दु:खात बुडाले. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी वॉर्न क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फिरकीपटू नव्हता, असे मत व्यक्त केले. यावर क्रिकेट विश्वातून गावसकर यांच्यावर टीका झाली. यानंतर आता गावसकर यांनी, ‘तो प्रश्नच चुकीचा विचारला गेला होता,’ असे सांगत आपल्या वक्तव्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. गावसकर यांनी एका इंग्रजी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सांगितले होते की, ‘माझ्यासाठी भारतीय फिरकीपटू आणि मुथय्या मुरलीधरन वॉर्नच्या तुलनेत सर्वोत्तम  आहेत. भारताविरुद्ध वॉर्नची कामगिरी अत्यंत साधारण आहे. त्याने केवळ एकदाच नागपूर येथे ५ बळी मिळवले होते. याव्यतिरिक्त त्याला भारताविरुद्ध फार मोठे यश मिळालेले नाही. मुरलीधरनने भारताविरुद्ध अनेकदा यशस्वी कामगिरी केली आहे. त्यामुळे तो वॉर्नहून उत्तम होता.’ इन्स्टाग्रामवरून मागितली माफीआपल्या वक्तव्यावरून सातत्याने झालेल्या टीकेनंतर गावसकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करत सांगितले की, ‘मागील आठवडा क्रिकेटसाठी अत्यंत वेदनादायक ठरला. आपण दोन दिग्गज खेळाडू गमावले. रॉड मार्श आणि शेन वॉर्न. मला एका सूत्रसंचालकाने विचारले की, वॉर्न महान फिरकीपटू आहे का? आणि यावर मी जी काही प्रतिक्रिया दिली ती माझी वैयक्तिक प्रतिक्रिया होती. हा प्रश्न विचारायला नको होता. ही ती वेळ नव्हती की मी वॉर्नचे मूल्यांकन करावे. तो महान क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.’

टॅग्स :सुनील गावसकर
Open in App