Join us

अफवा म्हणणाऱ्या बीसीसीआयचा सूर बदलला; विराट कोहलीच्या निर्णयानंतर जय शाह सह इतरांकडून आल्या प्रतिक्रिया

भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 19:30 IST

Open in App

भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांपासून विराट आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडेल अशी चर्चा होती. रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु बीसीसीआयनं हे वृत्त खोडून काढले होते. मात्र गुरुवारी विराटनं यावर मौन सोडलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आपण फक्त वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणार असल्याचे त्यानं जाहीर केलं अन् बीसीसीआयला तोंडावर पाडलं.  त्यानंतर आता बीसीसीआयचाही सूर बदलला.. 

विराटनं काय म्हटलं?

  • भारतीय संघाचे फक्त प्रतिनिधित्वच नव्हे तर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. 
  • कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. ट्वेंटी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन. 
  • रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली. 

 

बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला काय म्हणाले?ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं योगदान फक्त फलंदाज म्हणून नव्हे तर कर्णधार म्हणूनही अविश्वसनीय आहे. कर्णधारपद सोडण्याचा हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, आपण त्याचा आदर करायला हवा. मला विश्वास आहे की त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकेल, असे राजीव शुक्ला यांनी ANIला सांगितले. 

जय शाह म्हणतात, टीम इंडियाचा रोडमॅप ठरलाय!खेळाडूंवरील कामाचा ताण लक्षात ठेवता आम्ही टीम इंडियासाठी रोडमॅप ठरवला आहे. विराट कोहलीनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाप्रती आम्ही विराटचे आभार मानतो. युवा खेळाडू आणि दृढनिश्चय कर्णधार म्हणून तुझी कामगिरी वाखाण्यजोगी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तू नेतृत्व आणि वैयक्तिक कामगिरी याचातला ताळमेळ योग्यरितीनं सांभाळला आहे, असे जय शाह म्हणाले.  

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयजय शाह
Open in App