Test Retirement team India, IND vs ENG: टीम इंडियाचे दोन महान खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हे दोघेही आता इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. त्यातच आता असा अंदाज बांधला जात आहे की भारतीय संघातील आणखी एका स्टार खेळाडूची कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे. बीसीसीआय लवकरच इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ निवडणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा अनुभवी दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीला ( Mohammad Shami ) या दौऱ्यातून वगळले जाऊ शकते. तसे झाल्यास त्यालाही लवकरच कसोटी निवृत्तीची घोषणा करावी लागू शकेल.
संघातून वगळले जाण्याचे जवळपास निश्चित
बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने भारतीय क्रिकेट बोर्डाला सांगितले आहे की, ३४ वर्षीय शमीला सध्या लांब स्पेल टाकण्यात अडचण येऊ शकते. तसेच, तो पूर्ण पाच कसोटी सामने खेळण्याची शक्यता कमीच आहे. याच कारणामुळे बीसीसीआय त्याला दौऱ्यावर घेऊन जाण्यास इच्छित नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांना भारतीय संघात तंदुरुस्त गोलंदाजांचा समावेश करायचा आहे, जे गरज पडल्यास लांब स्पेल टाकू शकतात. बोर्डातील एका सूत्राने सांगितले की, शमी IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी ४ षटके टाकत आहे. पण बोर्ड आणि निवडकर्त्यांना माहित नाही की तो एका दिवसात १० पेक्षा जास्त षटके टाकू शकतो की नाही. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना लांब स्पेलसाठी विचारात घेतले जात आहे. अशा वेळी निवडकर्ते कोणतीही जोखीम पत्करू शकत नाहीत.
शमीचीही कसोटी निवृत्ती?
मोहम्मद शमी जवळजवळ २ वर्षांपासून भारताच्या कसोटी संघाबाहेर आहे. त्याने जून २०२३ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो कसोटी संघाबाहेर आहे. दुखापतीनंतर, त्याने या वर्षी टी२० आणि एकदिवसीय संघात पुनरागमन केले. शमीने चॅम्पियन्स ट्रॉफी देखील खेळली पण या काळात त्याची कामगिरी खूपच सामान्य होती. तो त्याच्या जुन्या लयीत दिसला नाही. तशातच आता वाढत्या वयामुळे त्याच्या IPL कामगिरीमध्येही फरक जाणवला. त्याला या हंगामात त्याला ९ सामन्यांत फक्त ६ विकेट्स घेता आल्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेटही (११.२३) देखील खराब होता. अशा परिस्थितीत अश्विन, रोहित आणि विराट या दिग्गज खेळाडूंसारखेच शमीलाही निवृत्ती जाहीर करण्याची वेळ येऊ शकते.