- अयाझ मेमन
सोमवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होईल आणि यासह गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरु असलेली संभाव्य संघाची चर्चाही संपुष्टात येईल, पण संघातील बहुतांशी खेळाडू जवळजवळ निश्चित असून, केवळ दोन जागांसाठी आता अनिश्चितता आहे. या दोन जागांसाठी कोणाची निवड करायची, यासाठी निवडकर्ते, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मोठी कसोटी लागली. याचे कारण म्हणजे, या दोन जागांसाठी ज्यांची ठामपणे निवड होऊ शकते, अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूकडून झालेली नाही.
माझ्या अंदाजाप्रमाणे दोन्ही जागा या फलंदाजासाठी असून, यातील एक जागा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून असेल, तर अन्य जागेवर तज्ज्ञ फलंदाजाची निवड होईल, पण दोघेही फलंदाज पहिल्या सात स्थानांपैकी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास सक्षम असतील. संघनिवड करताना आयपीएलमधील कामगिरीला निवड समिती कितपत महत्त्व देणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेआधी कर्णधार कोहलीने स्पष्ट केले होते की, ‘विश्वचषक संघनिवड करताना आयपीएलचा कोणताही परिणाम पडणार नाही.’ त्याचप्रमाणे, आयपीएल सुरू होण्याच्याआधी उपकर्णधार रोहित शर्मानेही कोहलीचेच मत पुन्हा मांडले होते.
दरम्यान, भारताने आॅस्टेÑलियाविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली. विशेष म्हणजे, त्यावेळी संघात दिनेश कार्तिक, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, रिषभ पंत आणि फारसा फॉर्ममध्ये नसलेल्या केदार जाधव यांचाही समावेश होता. त्यामुळेच निवडकर्त्यांना संघ निवड करताना, पुन्हा एकदा नव्याने विचार करणे अनिवार्य होते. आयपीएल कामगिरीविषयी म्हणायचे झाल्यास, लोकेश राहुलसारखा फलंदाज आघाडीच्या फळीत यशस्वी ठरला, तर दिनेश कार्तिकसारखा अनुभवी फलंदाज धावा काढण्यात झगडताना दिसला.
तरी आयपीएल टी२० क्रिकेटचा प्रकार असून, विश्वचषक संघनिवड ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी होत आहे, ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. या दोन्ही क्रिकेट प्रकाराची एकमेकांसोबत तुलना म्हणजे सफरचंद आणि संत्र्याची एकमेकांशी तुलना करण्यासारखे आहे. धोनीला पर्याय म्हणून दुसरा यष्टीरक्षक म्हणून पंत आणि कार्तिक यांच्यात थेट स्पर्धा आहे, तसेच फलंदाजांमध्ये रायुडू, राहुल, विजय शंकर, मयांक अग्रवाल, केदार यांच्यात स्पर्धा आहे.
माझ्या मतानुसार, शंकर आणि केदार यांनी आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. दोघांनी आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेत झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. दोघेही चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्यात सक्षम असून, ही गोष्ट त्यांच्यासाठी ‘प्लस पॉइंट’ आहे. दोघांना वगळणे निवडकर्त्यांसाठी खूप कठीण काम असेल.
>विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य संघ :
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, विजय शंकर, मयांक अग्रवाल/लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.
(संपादकीय सल्लागार)