Join us  

'त्या' कसोटी सामन्याने भारतीय क्रिकेटमध्ये घडवला क्रांतिकारी बदल - अनिल कुंबळे 

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघाचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. 1932 साली कसोटी दर्जा मिळाल्यापासून भारतीय क्रिकेट अनेक स्थित्यंतरामधून गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 7:58 PM

Open in App

नवी दिल्ली - जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघाचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. 1932 साली कसोटी दर्जा मिळाल्यापासून भारतीय क्रिकेट अनेक स्थित्यंतरामधून गेले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू अनिल कुंबळे याने 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकात्यातील इडन गार्डनवर झालेल्या झालेला ऐतिहासिक कसोटी सामन्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल घडल्याचे म्हटले आहे. या कसोटीत मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाने आपल्यातील क्षमता ओळखली आणि देशाबरोबरच परदेशातही चांगली कामगिरी केली होती. मायक्रोसॉफ्टचे  मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासोबत त्यांच्या हिट रिफ्रेश या पुस्तकावर आयोजित परिसंवादामध्ये बोलताना कुंबळेने भारतीय क्रिकेटबाबत मत मांडले.भारतीय क्रिकेटमध्ये असा कोणता क्षण आला, ज्याने देशातील क्रिकेटचे चित्र बदलले अशी विचारणा नडेला यांनी केली. तेव्हा कुंबळेने 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 च्या कोलकाता कसोटीत मिळावलेला विजय यांचा उल्लेख केला.  कुंबळे म्हणाला,"1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वचषकामुळे माझ्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळाली. या विजयामुळे आम्हीही देशासाठी खेळू शकतो. जगातील दिग्गज संघांना नमवी शकतो, असा आत्मविश्वास आमच्यात आला. पण तुम्ही भारतीय क्रिकेटमधील हिट रिफ्रेश मुव्हमेंट विचारत असाल तर, मी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2001 साली खेळवल्या गेलेल्या कसोटी मालिकेचा उल्लेख करेन."भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा कुंबळे पुढे म्हणाला,"त्या मालिकेत आम्ही विजय मिळवला होता. दुखापतीमुळे मी त्या मालिकेत खेळू शकलो नव्हतो. पण त्या मालिकेमुळे आम्हाला आमची योग्यता किती आहे. हे समजले. त्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आम्ही गमावला होता. दुसऱ्या सामन्यातील आव्हानही जवळपास संपले होते. पण राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यातील विक्रमी भागीदारीने सामन्याचे चित्र पालटवले. ती कसोटी आम्ही जिंकली. पुढे मालिकाही जिंकली. माझ्यासाठी माझ्या पिढीतील ही हिट रिफ्रेश मुव्हमेंटच होती."त्यानंतर कुंबळेला त्याच्या कारकीर्दीत बदल घडवून आणणाऱ्या घटनेविषयी विचारले असता कुंबळेने 2003-04 साली भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला."जेव्हा मी मागे वळून पाहतो. तेव्हा एक क्षण असा पाहतो ज्याने माझ्या कारकिर्दीची दिशा बदलली तो क्षण म्हणजे 2003-04 साली झालेला ऑस्ट्रेलिया दौरा. त्यावेळी मी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होतो. तिशी उलटून गेली होती. निवृत्तीबाबत विचारणा होऊ लागली होती. मात्र त्या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मला संधी मिळाली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केल्यानंतर मी चांगली गोलंदाजी करून त्यांच्या डावाला गुंडाळले होते. त्या सामन्यात द्रविड आणि लक्ष्मणने शतके फटकावली होती. तो सामना आम्ही जिंकलो होतो. माझ्यासाठी ही हिट रिफ्रेश मुव्हमेंट होती."  

टॅग्स :अनिल कुंबळेभारतीय क्रिकेट संघक्रिकेट