Join us  

गोंधळामुळे राज्यसभेत बोलता न आलेल्या सचिनने सोशल मीडियावरून साधला देशवासीयांशी संवाद

संसदेत घातल्या जाणाऱ्या गोंधळाची झळ गुरुवारी महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसली होती. दरम्यान, संसदेत म्हणणे मांडू न शकलेल्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या मदतीने देशवासियांसमोर आपले म्हणणे मांडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 5:07 PM

Open in App

नवी दिल्ली  - विविध कारणांमुळे सदस्यांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. संसदेत घातल्या जाणाऱ्या गोंधळाची झळ गुरुवारी महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसली होती. दरम्यान, संसदेत म्हणणे मांडू न शकलेल्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या मदतीने देशवासियांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त खासदार असलेल्या सचिनने फेसबूक आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून आपले व्हिजन मांडले आहे. भारताला स्पोर्टिंग नेशन बनवण्याची आपली इच्छा आहे. भारत केवळ खेळांना प्रोत्साहन देणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा, असे आपल्याला वाटते, असे सचिनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत बोलायला उभा राहिला होता. पण त्याला बोलताच आले नव्हते. कारण काय तर राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचे कामकाज गदारोळामुळे तहकूब झाले. साहजिकच खेळण्याचा अधिकार (राइट टू प्ले) या विषयावर सचिनचे विचार कोणालाच ऐकायला मिळाले नाहीत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीविषयी संशय व्यक्त करणारे विधान पंतप्रधान मोदींनी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारपासून गदारोळ सुरू होता. पंतप्रधान मोदींनी आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे वा निराधार आरोपांबद्दल माजी पंतप्रधानांसह संबंधितांची माफी मागावी असा विरोधकांचा आग्रह आहे. सभापती व्यंकय्या नायडूंनी सुरुवातीला हा अडथळा दूर करण्यासाठी सभागृह नेते अरुण जेटलींवर जबाबदारी सोपवली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. पंतप्रधानांनी ना स्पष्टीकरण दिले ना माफी मागितली.त्यामुळे राज्यसभेतला गोंधळही थांबलेला नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरचे पहिलेवहिले भाषणही वाहून गेले. राज्यसभेवर २0१२ साली नामनियुक्त झाल्यानंतर सभागृहात सचिनचे हे पहिलेच भाषण ठरणार होते. क्रीडा क्षेत्राची स्थिती, आॅलिम्पिक खेळांसाठी देशाची तयारी, भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेचे चांगले प्रदर्शन कसे होईल, यासह खेळण्याचा अधिकार या विषयावर बोलण्यासाठी सचिन तयारी करून आला होता.

टॅग्स :सचिन तेंडूलकरराज्यसभासंसदभारतक्रिकेटक्रीडा