सिडनी -आॅस्ट्रेलियाचे नवनियुक्त प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी टीम पेनची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी ही नव्या युगाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आॅस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली होती. आता लँगरवर ही प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये पेनकडे नेतृत्व सोपविण्याची शक्यता होती. स्टीव्ह स्मिथवर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आल्यानंतर या ३३ वर्षीय यष्टिरक्षकाकडे यापूर्वीच कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. द. आफ्रिकेच्या निराशाजनक दौºयानंतर आॅस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरेल. क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या (सीए) निवड समितीचे अध्यक्ष ट्रेव्हर हॉन्स म्हणाले, सीएला इंग्लंडमध्ये १५ सदस्यांच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी पेनच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. अॅरोन फिंच संघाचा उपकर्णधार राहील.
आॅस्ट्रेलियन क्रिकेट गेल्या
काही दिवसांपासून निराशाजनक कालखंडातून मार्गक्रमण करीत असून पेन झपाट्याने त्यातून संघाला बाहेर काढण्यात यशस्वी ठरेल. अनेक वर्षे संघाबाहेर राहिल्यानंतर त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संघात पुनरागमन केले. संघाबाहेर असताना एकवेळ त्याने निवृत्तीबाबतही विचार केला होता. ‘सीए’ने इंग्लंडविरुद्ध एकमेव टी-२० साठीही संघ जाहीर केला.