Join us  

कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा

जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ WTC 2023-2025 च्या तयारीला लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 4:22 PM

Open in App

जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ WTC 2023-2025 च्या तयारीला लागला आहे. शुक्रवारपासून ऑस्ट्रेलिया -इंग्लंड या दोन कट्टर प्रतिस्पर्धींच्या Ashes मालिकेतून WTC 2023-2025 ला सुरुवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, परंतु दोन्ही वेळेस त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी WTC ची मानाची गदा पटकावली आहे. आता WTC च्या तिसऱ्या पर्वात एकूण २७ मालिकांमध्ये ६८ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत आणि फायनल २०२५ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे.

WTC 2023-25 मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज असे ९ संघ सहभागी होणार आहेत. या संघाना दोन ते पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. हे ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील आणि त्यापैकी ३ मालिका या घरच्या मैदानावर होतील.  त्यानंतर अव्वल दोन संघ फायनलमध्ये जेतेपदाची गदा जिंकण्यासाठी खेळतील.  

WTC 2021-23 च्या वेळापत्रकाप्रमाणे भारत-इंग्लंड यांच्यात यंदाही पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीची मालिकाही पाच सामन्यांची मालिका होईल आणि १९९२ नंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ९ संघांना समान सामने खेळण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे जय-पराजयाच्या टक्केवारीवर अव्वल दोन संघ ठरणार आहेत.

इंग्लंडचा संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया व भारत यांच्या वाट्याला १९ कसोटी सामने आले आहेत.  WTC मध्ये विजयी संघाला १२ गुण, सामना ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ४ आणि टाय झाल्यात दोन्ही संघांना प्रत्येकी ६ गुण दिले जाणार आहेत. षटकांची मर्यादा संथ ठेवल्यास संघांचे गुण वजा केले जातील.  

भारताचे वेळापत्रक ( Team India's schedule in WTC cycle 2023-25)

  • २ कसोटी वि. वेस्ट इंडिज ( वेस्ट इंडिज- जुलै/ऑगस्ट)
  • २ कसोटी वि. दक्षिण आफ्रिका ( द. आफ्रिका - डिसेंबर/जानेवारी २०२४)
  • ५ कसोटी वि. इंग्लंड ( भारत - जानेवारी/ फेब्रुवारी २०२४)  
  • २ कसोटी वि. बांगलादेश ( भारत - सप्टेंबर/ऑक्टोबर २०२४)  
  • ३ कसोटी वि. न्यूझीलंड ( भारत - ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४)
  • ५ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( ऑस्ट्रेलिया - नोव्हेंबर/जानेवारी २०२५) 
  •  
  •  
टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअ‍ॅशेस 2019
Open in App