Join us  

Team India Test Captain: जसप्रीत बुमराहनंतर आता मोहम्मद शामीचंही कसोटी कर्णधारपदाबाबत मोठं विधान, म्हणाला...

विराटने अचानक कसोटी कर्णधार पद सोडल्यामुळे आता नवा कर्णधार कोण? यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 4:15 PM

Open in App

Team India Test Captain: भारतीय संघाने दक्षिणा आफ्रिकेत आघाडीवर असलेली कसोटी मालिका गमावली. २-१ असा कसोटी मालिका पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने तडकाफडकी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कसोटी कर्णधार कोण होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की रोहित शर्माकडेच ही जबाबदारी जाणार असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. बीसीसीआय अधिकृत घोषणा कधी करेल याकडे सर्वच क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधी कर्णधार पदाबाबत क्रिकेट जाणकार आणि चाहते वेगवेगळे पर्याय सुचवत आहेत. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहला याबद्दल विचारले असता, कर्णधार पद मिळाल्यास तो सर्वोच्च सन्मान असेल, असं तो म्हणाला होता. त्यानंतर आता मोहम्मद शमीनेदेखील मोठं विधान केलं.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. मुलाखती दरम्यान त्याने आपलं मत मांडलं. "आताच्या घडीला मी कसोटी कर्णधार पदाबद्दल अजिबातच विचार करत नाहीये. संघात मला जी जबाबदारी दिली जाईल, ती जबाबदारी मी नीट पार पाडेन. मी सध्या माझ्या कामगिरीकडे लक्ष देत आहे. पण खरं सांगायचं तर टीम इंडियाचं कर्णधार बनायला कोणाला आवडणार नाही? सगळ्यांचं ते स्वप्न असतं. पण त्या गोष्टींचा आता तरी विचार करत नाही. सध्या मी फक्त संघातील माझ्या भूमिकेचा विचार करतोय", अशी भावना शमीने व्यक्त केली.

भारतीय संघात नेतृत्वाची खांदेपालट झाल्यापासून कर्णधार पदासाठी अनेक खेळाडूंचा विचार केला जात आहे. वन डे आणि टी२० क्रिकेटसाठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावाची कर्णधार म्हणून याआधीच घोषणा केली आहे. कसोटी कर्णधार पददेखील त्याच्याकडेच जाईल हे जवळपास निश्चित आहे. पण निर्धारित सामन्यांच्या क्रिकेट संघासाठी वेगळा आणि कसोटीसाठी वेगळा कर्णधार निवडण्याची (Split Captaincy) जर बीसीसीआयची योजना असेल, तर मात्र कसोटीसाठी वेगळ्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. भारताची आगामी कसोटी मालिका श्रीलंकेविरूद्ध आहे. त्याच वेळी या गोष्टीचा उलगडा होईल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहमोहम्मद शामीरोहित शर्मा
Open in App