Join us  

टीम इंडिया आव्हान पेलण्यास सज्ज : पुजारा

आतापर्यंत ८५ कसोटीत ६२४४ धावा करणारा पुजारा म्हणाला की, डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्रता मिळविणे भारतीय संघासाठी विशेष उपलब्धी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 5:29 AM

Open in App

साउदम्पटन : इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करण्याची कामगिरी केल्यामुळे न्यूझीलंड संघ विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये लाभाच्या स्थितीत राहील, पण भारतीय संघ उपलब्ध वेळेचा उपयोग १८ जूनपासून येथे खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीच्या तयारीसाठी करेल, असे भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हटले आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारत आपले दोन संघ तयार करीत लढतीसाठी सज्ज होत आहे, तर न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-० ने विजय मिळवित चांगली तयारी केली आहे.

भारतीय खेळाडू सुरुवातीला आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे मध्यंतरीच स्थगित करावी लागली. पुजारा म्हणाला,‘फायनलपूर्वी दोन कसोटी सामने खेळले असल्यामुळे किवी संघ लाभाच्या स्थितीत आहे, पण फायनलचा विचार करता आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. आमच्या संघात चांगली कामगिरी करण्याची व चॅम्पियनशिप जिंकण्याची क्षमता आहे, याची आम्हाला कल्पना आहे.त्यामुळे आम्हाला त्याची चिंता सतावत नाही. 

आम्हाला तयारीसाठी जो १०-१२ दिवसांचा वेळ मिळाला आहे त्यात आम्ही एकाग्र राहण्यासाठी प्रयत्नशील असू. आम्ही एक सराव सामनाही खेळू आणि उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम वापर करू. जर आम्ही या दिवसांचा चांगला वापर करू शकलो तर मला वाटते की आमचा संघ            फायनलचे आव्हान पेलण्यास सज्ज राहील.’सौराष्ट्रचा मधल्या फळीतील फलंदाज म्हणाला की,‘खेळाडूंसाठी सर्वांत मोठे आव्हान इंग्लंडमधील वातावरणासोबत जुळवून घेण्याचे राहील. येथे एकाच दिवशी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळणे फलंदाजांसाठी आव्हानात्मक राहील. कारण पाऊस आला तर तुम्हाला मैदानाबाहेर पडावे लागते आणि त्यानंतर अचानक पाऊस थांबतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागते.’

आतापर्यंत ८५ कसोटीत ६२४४ धावा करणारा पुजारा म्हणाला की, डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्रता मिळविणे भारतीय संघासाठी विशेष उपलब्धी आहे. त्याने सांगितले,‘वैयक्तिक विचार करता माझ्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. कारण मी केवळ एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे आणि क्रिकेटमधील हे सर्वांत आव्हानात्मक स्वरुप आहे. येथे पोहचण्यासाठी संघ म्हणून आम्ही बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे सर्वंच खेळाडू त्यासाठी उत्सुक असतील, असा मला विश्वास आहे. फायनल जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पण, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघाने दोन वर्षे कसून मेहनत केली आहे. भारतीय टीम एकसंघ आहे. कारण खेळाडूंनी बायोबबलमध्ये बराच वेळ एकत्र घालविला आहे, असेही पुजारा म्हणाला. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ