Join us  

World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम

या विजायतच टीम इंडियानं नोंदवलेला अजरामर विक्रम दडला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 11:02 AM

Open in App

भारतीय संघानं 2011साली आजच्याच दिवशी वन वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. भारतीय संघानं वानखेडेवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून 28 वर्षांची वन डे वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा संपवली होती. या विजयाबरोबर भारतीय संघानं स्वतःच्या नावावर असा विक्रम नोंदवला जो जगातला कोणताच संघ मोडू शकत नाही. भारतीय संघानं 1983नंतर 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला. तत्पूर्वी 2007मध्ये टीम इंडियानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला.  

भारताने पहिला वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली उंचावला. 1983साली लॉर्ड्स मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दोन वेळचे विजेते वेस्ट इंडिजचा रथ अडवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 183 धावा उभ्या केल्या. कृष्णमचारी श्रीकांत ( 38), मोहिंदर अमरनाथ ( 26), संदीप पाटील ( 27) यांच्या खेळीनं टीम इंडियानं 54.4 षटकांत सर्वबाद 183 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 52 षटकांत 140 धावांत माघारी परतला. अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. 

त्यानंतर 2007मध्ये टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात जोगींदर शर्मानं अखेरच्या षटकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 बाद 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानला 19.3 षटकांत सर्वबाद 152 धावा केल्या. भारतानं पाच धावांनी हा सामना जिंकला. जोगिंदर शर्मानं अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या मिसबाह-उल हकला बाद करून भारताला विजय मिळवून दिला.

2011मध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद 103 धावांच्या दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी 6 बाद 274 धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग भोपळाही न फोडता माघारी परतला, तर सचिन तेंडुलकर केवळ 18 धावांवर परतला. यामुळे भारताचा डाव 2 बाद 31 धावा असा अडचणीत आला होता. मात्र विराट कोहली (35) आणि गौतम गंभीर (97) या दिल्लीकरांनी भारताचा डाव केवळ सावरलाच नाही, तर या विश्वविजयाचा पायाही रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  ही जोडी माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला.  या विजयाबरोबर टीम इंडियानं असा विक्रम नोंदवला की जो जगातला कोणताच संघ मोडू शकत नाही. भारतीय संघानं 60, 50 आणि 20 षटकांच्या क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकले आहेत. जगात असा विक्रम करणारा भारत हा एकमेव संघ आहे. 

टॅग्स :कपिल देवमहेंद्रसिंग धोनी