Team India Records, IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीचे दमदार शतक (१३५) आणि केएल राहुल(६०), रोहित शर्माची(५७) अर्धशतके याच्या जोरावर टीम इंडियाने ५० षटकांत ८ बाद ३४९ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेला मॅथ्यू ब्रिट्झके (७२), मार्को यान्सेन (८०) आणि कॉर्बिन बॉश (६७) या तिघांच्या झुंजार खेळीच्या जोरावर ३३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. पण सामना जिंकल्यावरही भारतीय गोलंदाजांच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
टीम इंडियावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
आफ्रिकेच्या संघाने ३५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अतिशय खराब सुरूवात केली होती. सलामीवीर रायन रिकल्टन आणि क्विंटन डी कॉक हे दोघेही शून्यावर बाद झाले होते. त्यापाठोपाठ कर्णधार एडन मार्करमदेखील ७ धावा काढून बाद झाला. त्यामुळे आफ्रिकेने १५ धावांच्या आतच ३ बळी गमावले होते. असे होऊनही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ५० षटकांच्या या सामन्यात तब्बल ३३२ धावा दिल्या. १५ धावांपेक्षा कमी स्कोअरवर तीन बळी गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ३०० धावांपेक्षा जास्त धावा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
विराट कोहलीचे दमदार कमबॅक
भारतीय संघाचा रनमशिन विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वनडे सामन्यात त्याला केवळ एक अर्धशतक ठोकता आले. त्यामुळे आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत विराटच्या खेळीकडे लक्ष होते. विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने १२० चेंडूत तब्बल १३५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. त्यासोबतच विराटने ७ षटकारही मारले.