Join us  

Rahul Dravid : रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद; BCCIकडून दुजोरा

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 3:53 PM

Open in App

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर दी वॉलकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे.  ही जबाबदारी आता पुन्हा एकदा द्रविडकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या ( BCCI) अधिकाऱ्यानं दिली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे आणि तीन दिवसानंतर भारत-न्यूझीलंड यांच्यातली मालिका सुरू होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे.

''न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आली आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यापर्यंत नवीन प्रशिक्षकाची घोषणा होईपर्यंत, द्रविड हे पद सांभाळेल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport शी बोलताना सांगितले.  

नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयकडे वेळ कमी आहे आणि त्यांना ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधारही निवडायचा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर कायम न राहण्याचा निर्णय विराटनं जाहीर केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याला पंजाब किंग्सचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक बनवायचे आहे, परंतु बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्या या कल्पनेला विरोध दर्शवला आहे. कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील संवाद हा त्याला कारणीभूत आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान बीसीसीआयकडे परदेशी प्रशिक्षक निवडीसाठीही वेळ नाही. त्यामुळे बीसीसीआयनं अजूनही या पदासाठी जाहीरात काढलेली नाही. टॉम मूडी, लान्स क्लुझनर हे या पदासाठी इच्छुक आहेत. दिल्ली कॅपिटलस्चा कर्णधार रिकी पाँटिंग हाही या पदाच्या शर्यतीत आहे, परंतु नवा प्रशिक्षक हा भारतीयच असेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 

''न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल  द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपद असेल आणि क्रिकेट सल्लागार समिती नवीन प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया पूर्ण करेल. राहुलला पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक बनायचे नाही,''असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. राहुल द्रविडनं अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण, बीसीसीआयचा हा प्रस्ताव राहुल द्रविड मान्य करेल, अशी आशा आहे.   

टॅग्स :राहूल द्रविडभारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआय
Open in App