Join us  

India vs South Africa 3rd ODI: "आम्हाला एक गोष्ट समजली की..."; लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने केली चूक मान्य, दिली प्रामाणिक कबुली

भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:47 PM

Open in App

IND vs SA 3rd ODI: भारतीय संघाने इतिहासात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिका दौरा केला आणि दौऱ्याच्या शेवटी लाजिरवाण्या पराभवासह मालिका संपली. १-० ने कसोटी मालिकेत आघाडीवर असलेल्या भारताला नंतर एकही सामना जिंकता आला नाही. आधी भारताने कसोटी मालिका २-१ ने गमावली. त्यापाठोपाठ रविवारी वन डे मालिकेतही त्यांना आफ्रिकेकडून व्हाईटवॉश मिळाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर राहुलने चूक मान्य करत काही गोष्टींची प्रामाणिक कबुली दिली.

सामना संपल्यानंतर राहुलने स्पष्ट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. "आता आम्हाला एक गोष्ट नीट समजली आहे की आमच्या काय काय चुका झाल्या आणि आता आम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे. टीम इंडियाकडून खेळताना खेळातील विशिष्ट परिस्थितीची समज, मैदानावरील ऊर्जा आणि नेतृत्व कौशल्य या गोष्टींकडे आता आम्हा साऱ्यांनाच विशेष लक्ष द्यावं लागणार आहे," असं तो म्हणाला.

"कोणताही खेळ खेळताना खेळाडूंकडून चुका होतात. त्यामुळे यापुढेही खेळाडूंकडून चुका होत राहतील हे नक्की, पण त्या चुकांमधून शिकणं आता गरजेचं आहे. वन डे मालिकेत आम्ही त्याच त्याच चुका सातत्याने करत राहिलो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ कायम वरचढ ठरला. पण आता मात्र आमच्यापैकी प्रत्येकाने आरशासमोर उभं राहून स्वत:ला काही प्रश्न विचारायला हवेत आणि स्वत:शी थोडासा संवाद साधायला हवा", अशी प्रामाणिक कबुलीदेखील राहुलने यावेळी दिली.

"दीपक चहरच्या खेळीने आम्हाला जिंकण्याची संधी होती, पण आम्ही विजय मिळवू शकलो नाही. सामना अटीतटीचा झाला. सामना हारल्याचं दु:ख आहे. साऱ्यांनाच कल्पना आहे की आम्ही नक्की कुठे चुकलो. फलंदाज म्हणून आम्ही काही बेजबाबदार खेळ केला. त्यामुळे आम्ही संधी गमावली. गोलंदाजीतही अनेक चुका झाल्या. प्रतिस्पर्धी संघावर आम्ही अजिबातच दबाव टाकू शकलो नाही. त्यामुळे आमचा मालिकेत वाईट पराभव झाला", असं राहुलने स्पष्टीकरण दिलं.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलविराट कोहलीशिखर धवन
Open in App