Join us  

टीम इंडियाचे पुन्हा येरे माझ्या मागल्या...

मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर खेळण्याची वेळ आली की दाणादाण उडण्याची भारतीय संघाची सवय जाता जात नाही.

By balkrishna.parab | Published: January 17, 2018 10:45 PM

Open in App

मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर खेळण्याची वेळ आली की दाणादाण उडण्याची भारतीय संघाची सवय जाता जात नाही. काळ बदलला, वेळ बदलली, खेळाडूही बदलले, पण भारतीय फलंदाजांचे वेगवान गोलंदाजांसमोर घालीन लोटांगण घालण्याचे दुखणे काही गेले नाही. बुधवारी आटोपलेल्या सेंच्युरियन कसोटीत भारतीय फलंदाजांच्या हाराकिरीचा नवा अध्याय समोर आला. पहिल्या कसोटीत नामुष्की पत्करल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांची आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर घसरगुंडी ऊडाली. विराट कोहलीच्या पहिल्या डावातील दीडशतकी खेळीचा अपवाद वगळता या सामन्यात भारतीय फलंदाज यजमान गोलंदाजांवर वरचढ होताना दिसले नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू असल्याने आणि स्वत: कर्णधार विराट कोहलीसह, शिखर धवन, मुरली विजय, रोहित शर्मा, लोकेश राहुल चेतेश्वर पुजारा असे धडाकेबाज फलंदाज दिमतील असल्याने भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये दमदार कामगिरी करेल, असा दावा केला जात होता. त्यातही दक्षिण आफ्रिकेत पहिला मालिका विजय नोंदवला जाणारच, असा दावाही काही जण ठोकत होते. पण आफ्रिकन भूमीवर घडले ते उलटेच. कोणत्याही पूर्वतयारीविना दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेला भारतीय संघ केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्याच कसोटीत डाऊन झाला. मायदेशातील आणि भारतीय उपखंडातील फलंदाजांसाठी सुपीक असणाऱ्या खेळपट्टयांवर धावांचे अमाप पीक घेणाऱ्या रथी महारथींना आफ्रिकेतील वेगवान खेळपट्ट्यांवर धावांच्या दुष्काळाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेकडे मोर्ने मॉर्केल, व्हेर्नन फिलँडर, कागिसो रबाडा असे वेगवान गोलंदाज तर भारताकडे विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा असे दिग्गज फलंदाज असल्याने या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी विरुद्ध भारताची फलंदाजी असाच सामना होणार हे जवळपास निश्चित होते. अगदी झालेही तसेच. पण त्यात बाजी मारली ती दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी. मॉर्केल, फिलँडर आणि रबाडाच्या वेगवान त्रिकुटासमोर भारताची दाणादाण उडाली. त्यात दुसऱ्या सामन्यात तर लुंगी एन्डिगीने भारतीय दिग्गजांची पुंगी वाजवली. वेगवान खेळपट्ट्यांचा फायदा उठवत बुमरा, शमी, इशांत आणि भुवनेश्वरने केलेली चांगली गोलंदाजी हीच काय ती भारतीय संघासाठी सकारात्मक बाब. पण फलंदाजांच्या सुमार खेळाने गोलंदाजांच्या या मेहनतीचे मातेरे केले. दक्षिण आफ्रिकेसारखा आव्हानात्मक दौरा असताना भारतीय संघाने त्याची पुरेशी पूर्वतयारी केली नाही. त्यात संघनिवड करताना गोंधळ घातला गेला. सलामीवीरच चमकले नाहीत. तर तंत्रशुद्ध पुजाराला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपेक्षा धांद्रटपणा जास्त नडला. रोहित शर्मा एवढा अनुभव गाठीशी येऊनही अजून मर्यादित षटकांचे क्रिकेट आणि भारतीय खेळपट्ट्यांवरील वातावरणातून बाहेर आलेला नाही. याचा कटू परिणाम म्हणजे भारतीय फलंदाजांची उडालेली दाणादाण होय.  दक्षिण आफ्रिकेच्या भूमीमधील पराभवांची मालिका खंडित करून विजयाचा नवा अध्याय लिहिण्याच्या इराद्याने विराटसेना दक्षिण आफ्रिकेत गेली होती. पण सलग दोन पराभवांचा सामना करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात जाऊन कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिलेय. आता तिसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करून कसोटी किमान अनिर्णित राखत नामुष्की टाळण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.   

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीद. आफ्रिकाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८