Join us  

चार वर्षांपासून चौथ्या स्थानासाठी टीम इंडियाकडून प्रयोग सुरूच

विश्वचषकाला आता केवळ अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही टीम इंडियाला फलंदाजीचा क्रम ठरविण्यात यश आलेले दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 3:49 AM

Open in App

नवी दिल्ली: विश्वचषकाला आता केवळ अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही टीम इंडियाला फलंदाजीचा क्रम ठरविण्यात यश आलेले दिसत नाही. चौथ्या स्थानाचा शोध कायम असून गेल्या चार वर्षांत या जागेसाठी सातत्याने प्रयोग झाले. तब्बल ११ फलंदाजांना या स्थानासाठी अजमावण्यात आले, पण एकही अपेक्षापूर्ती करू शकला नाही.२०१५ पासून चौथ्या स्थानावर सर्वाधिक १४ वेळा अंबाती रायुडूला संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी रायुडूचे चौथे स्थान नक्की मानले जात होते, पण पहिल्या तीन सामन्यात त्याने केवळ ३३ धावा काढल्याने संघ व्यवस्थापनाने अखेरच्या दोन लढतीत पुन्हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहली स्वत: चौथ्या स्थानी खेळला. त्याने आतापर्यंत या स्थानावर खेळून ३ सामन्यात केवळ ३० धावा केल्या. यामुळे कोहली तिसऱ्या स्थानासाठीच योग्य आहे. रायुडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी गेल्या १४ सामन्यात ४६४ धावा केल्या. कुठल्याही फलंदाजासाठी या आदर्श धावा ठराव्यात. धोनी मागील चार वर्षांत १२ वेळा चौथ्या स्थानी खेळला. त्यात त्याने ४४८ धावा केल्या. तसेच, अजिंक्य रहाणे दहा वेळा या स्थानावर खेळला आणि त्याने ४२० धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)लोकेश राहुलने ४ सामन्यात २६, केदार जाधवने ४ सामन्यात १८ आणि हार्दिक पांड्याने ५ सामन्यात चौथ्या स्थानावर खेळून विशेष छाप पाडली नाही. त्याने इंदूर येथे केवळ एकदा आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ मध्ये ७८ धावा ठोकल्या होत्या. अशावेळी विश्वचषकाआधी डोकेदुखी ठरलेल्या चौथ्या स्थानी खेळणार कोण हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :आयसीसी विश्वकप २०१९अंबाती रायुडूअजिंक्य रहाणेकेदार जाधवमहेंद्रसिंग धोनीविराट कोहली