मुंबई : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयोजित आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी शनिवारी १५ सदस्यांचा भारतीय संघ जाहीर झाला. निवड समितीने वर्तमान फॉर्म लक्षात घेत उपकर्णधार शुभमन गिल याला बाहेरचा रस्ता दाखविला.
ऑफ फॉर्म असलेल्या सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व कायम ठेवताना उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपविले. याशिवाय सलामीचा पर्याय म्हणून इशान किशनला, तर फिनिशर म्हणून रिंकू सिंग याला स्थान दिले. जसप्रीत बुमराहच्या सोबतीला अर्शदीपसिंग आणि हर्षित राणा यांना संधी देत दूरदर्शीपणा दाखविला.
शुभमनने २०२५ मध्ये १५ सामन्यांत २४.२५ च्या सरासरीने २९१ धावा केल्या, तर सूर्याने २१ सामन्यांत १३.६२ च्या सरासरीने २१८ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन याने स्थान टिकविले असले तरी त्याच्यासमोर इशान किशनचे आव्हान असणार आहे. किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत १० सामन्यांत ५१७ धावा केल्या आहेत. तो यष्टिरक्षक म्हणून पहिला पर्याय असेल.
तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे व अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील. हर्षित राणा हा तिसरा पर्याय असेल. कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती हे दोन फिरकीपटू संघात आहेत.
इशान दोन वर्षांनंतर परतला...
संघात निवड झाल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन म्हणाला,' टी-२० संघात निवड झाली त्याचा आनंद आहे. पुनरागमनासाठी कठोर मेहनत घेतली.' इशान किशनने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दोन वर्षांनी संघात पुनरागमन केले. इशान शेवटचा सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळला होता. बेशिस्तीमुळे इशानला संघातून डच्चू देण्यात आला. केंद्रीय करारही रद्द करण्यात आला. इशानने दमदार कामगिरीच्या जोरावर थेट विश्वचषक संघात एंट्री हार मानली नाही.
भारतीय टी-२० संघ
सलामीवीर : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टिरक्षक) मधली फळी : सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग अष्टपैलू: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उप कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर
वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, अर्शदीपसिंग, हर्षित राणा फिरकी गोलंदाज : कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
भारताचे सामने
७ फेब्रुवारी २०२६ : भारत वि. अमेरिका, वानखेडे स्टेडियम, मुंबई
१२ फेब्रुवारी : भारत वि. नामिबीया, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
१५ फेब्रुवारी : भारत वि. पाकिस्तान, आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
१८ फेब्रवारी : भारत वि. नेदरलँड्स, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद