Join us

टेलर न्यूझीलंडचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, तिसऱ्यांदा मिळविले ‘सर रिचर्ड हॅडली’ पदक

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रमही त्याने केला; आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 06:45 IST

Open in App

वेलिंग्टन : अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा यंदाच्या वर्षात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला. त्याने यंदा तिन्ही प्रकारांत शानदार कामगिरी करताना तिसऱ्यांदा ‘सर रिचर्ड हेडली’ पदक पटकावले. यंदाच्याच सत्रात त्याने माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा बनवणा-या फलंदाजाचा मान मिळविला होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रमही त्याने केला; आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.जुलैमध्ये न्यूझीलंडला विश्वचषक अंतिम सामन्यात स्थान मिळवून देण्यातही टेलरने मोलाचे योगदान दिले होते. तीन दिवस रंगलेल्या या आॅनलाइन पुरस्कार सोहळ्यानंतर टेलरने म्हटले की, ‘यंदाचे सत्र माझ्यासाठी उतार-चढावाचे राहिले. अंतिम सामन्यात पोहोचलो व नंतर तो सामना गमावला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात माझा सहभाग होता. त्या सामन्यात न्यूझीलंड समर्थकांकडून मिळालेला पाठिंबा मी कधीही विसरू शकत नाही.’दिग्गज क्रिकेटपटू हेडली यांनीही टेलरचे अभिनंदन करत सांगितले की, ‘मी तुला २००६ सालापासून खेळताना पाहत आहे. तू जेव्हा तुझा पहिला एकदिवसीय आणि नंतर पहिला कसोटी सामना खेळलेलास, तेव्हा मी निवड समितीचा सदस्य होतो. तू शानदार खेळाडू आहेस. तुझा रेकॉर्डही शानदार आहे.’ वेगवान गोलंदाज टिम साऊदी ‘सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू’ ठरला. केन विलियम्सनला ‘सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू’ म्हणून निवडण्यात आले. (वृत्तसंस्था)