कानपूर : भारताविरुद्ध दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नव्या चेंडूवर स्विंगचा लाभ घेत भारताला लवकर बाद करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितले.
जेमिसनचे पहिले लक्ष्य श्रेयस-जडेजा यांच्यातील शतकी भागीदारी खंडित करणे हे असेल. भारताने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५८ धावा केल्या. त्याच पाचव्या गड्यासाठी या दोघांनी आतापर्यंत ११३ धावांचे योगदान दिले. जेमिसनने ४७ धावांत तीन गडी बाद केले आहेत. तो म्हणाला, ‘नवा चेंडू सकाळच्या सत्रात स्विंग होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे पहिला डाव गुंडाळण्यास लाभ होईल.’ जेमिसनने मयंकश शुभमन आणि अजिंक्य यांना बाद करीत भारताला ३ बाद १४५ असे बॅकफूटवर ढकलले होते. पदार्पण करणारा श्रेयस आणि जडेजा यांनी मात्र भागीदारीच्या बळावर संघाचे वर्चस्व निर्माण केले.
जेमिसन म्हणाला, ‘माझ्या मते भारताने खेळावर वर्चस्व गाजविले. उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर जडेजा-अय्यर यांनी दमदार फटकेबाजी केली. मी विदेशात तिसरी कसोटी खेळत आहे. सुरुवातीला चेंडू स्विंग होत होता, मात्र नंतर हवा तसा लाभ झाला नाही. या खेळपट्टीवर अनेक चढउतार अनुभवायला मिळाले. दुसऱ्या दिवशी आम्ही पकड निर्माण करण्यात यशस्वी होऊ, अशी आशा आहे.’