Join us  

Tahlia Mcgrath, AUS vs ENG 1st T20: ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं... आधी घेतल्या तीन विकेट्स नंतर ठोकल्या ९१ धावा

ताहलियाकडे शतक झळकावण्याची संधी होती, पण कर्णधार लेनिंगने शेवटच्या आठ धावा करत सामना संपवून टाकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 7:48 PM

Open in App

Tahlia Mcgrath, AUS vs ENG 1st T20: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघांमधील अॅशेस मालिका संपुष्टात आली असून, यजमान ऑस्ट्रेलियाने ४-० अशा फरकाने सहज विजय मिळवला. आता दोन्ही देशांच्या महिला संघांमधील अॅशेस मालिकाही आजपासून सुरू झाली. त्यातही ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजीच्या जोरावर मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात युवा अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा चमकली. तिने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत दमदार कामगिरी केली.

अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या टी२० सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर डॅनीयल वॅटने संघासाठी जबरदस्त खेळी करत ५४ चेंडूत ७० धावा केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वॅटशिवाय सलामीवीर टॅमी ब्युमॉन्ट (३०) आणि नॅट सिव्हर (३२) यांनीही फटकेबाजी केली. त्यामुळे इंग्लंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून २६ वर्षीय अष्टपैलू ताहलिया मॅकग्राने ४ षटकात केवळ २६ धावा देत 3 बळी टिपले. तिने वॅट, सिव्हर आणि एमी जोन्स यांना माघारी धाडलं.

१७० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एलिसा हिलीने अवघ्या ७ धावा केल्या. त्यानंतर आपला चौथा टी२० सामना खेळत असलेल्या मॅकग्राला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. तिने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मॅकग्राने अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ४९ चेंडूत नाबाद ९१ धावा कुटल्या. ९१ धावांपैकी ५८ धावा तिने केवळ १४ चेंडूत चौकार-षटकारांच्या मदतीनेच केल्या. तिने १३ चौकार आणि १ षटकारासह आपली खेळी सजवली.

मॅकग्राने कर्णधार मेग लेनिंगसोबत ७९ चेंडूत १४४ धावांची नाबाद भागीदारी केली. कर्णधार लेनिंगनेही अर्धशतक केलं. लेनिंगने ४४ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. ताहलियाकडे शतक झळकावण्याची संधी होती, पण कर्णधार लेनिंगने शेवटच्या आठ धावा स्वत:च करत सामना संपवून टाकला आणि संघाला १७ व्या षटकात विजय मिळवून दिला.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App