Join us  

T20 World Cup, Virat Kohli : ... तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन; कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीचं धक्कादायक विधान 

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ५० पैकी ३० ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर १६ मध्ये पराभव पत्करावा लागला. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णीत राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 11:41 PM

Open in App

T20 World Cup, Virat Kohli last T20I as Captain : भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेणारा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आता ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार नाही. कर्णधार म्हणून नामिबियाविरुद्धचा त्याचा सामना हा अखेरचा होता. आता तो एक फलंदाज म्हणून संघात खेळेल आणि संघासाठी योगदान देत राहिल. भारतानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियावर ९ विकेट्स व २८ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण भावनिक झालं होतं. त्यात विराटनं सामन्यानंतर '... तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन', असे विधान करून सर्वांना बुचकळ्यात टाकले. 

कर्णधार म्हणून विराटनं ४६ डावांमध्ये १५७० धावा केल्या आहेत. त्यात १३ अर्धशतकं असून नाबाद ९४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलेली. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम विराटनं केला. आयसीसीच्या सर्व स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणारा ( चॅम्पियन्स ट्रॉफी, वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे.  

२०१७मध्ये सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियानं सलग १२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला तो विराटच्या नेतृत्वाखाली. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला. भारतानं ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत नमवले. २०१०-२० या कालावधीत ट्वेंटी-२०त सलग १० मॅच जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियानं केला. 

विराट कोहली म्हणाला...

कर्णपदाचा भार कमी झाल्यानं थोडा आराम वाटतोय... आता थोडसा आराम वाटतोय... मी आधीही सांगितलं की टीम इंडियाचे नेतृत्व करणे हे माझा सन्मान समजतो, परंतु आता योग्य दृष्टीकोन घेऊन पुढे जायला हवं. कार्यभाराचं योग्य नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे. मागील ६-७ वर्ष मैदानावर तीव्रतेनं क्रिकेट खेळलो आणि प्रत्येक वेळी अधिकाधिक देण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात खूप मजा आली, चांगले सहकारी मिळाले आणि संघ म्हणून कामगिरीही चांगली झाली. वर्ल्ड कप स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही, याची जाण आहे, परंतु ट्वेंटी-२० आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी केली आहे. ट्वेंटी-२० क्रिकेट हा थोड्याच्या फरकानं फिरणारा सामना आहे. पहिल्या दोन  सामन्यांत दोन षटकांत सामना फिरला आणि सर्व काही विस्कळीत झालं. आम्ही लढाऊ वृत्ती दाखवण्यात अपयशी ठरलो. नाणेफेकीचं कारण पुढे करणारा आमचा संघ नाही,'' असं विराट म्हणाला. सपोर्ट स्टाफचे विशेष आभार...रवी शास्त्री, भरत अरूण व आर श्रीधर यांचाही कार्यकाळ आजच्या सामन्यानंतर संपुष्टात आला आहे. त्यांचे विराटनं आभार मानले. तो म्हणाला, या सर्वांचे खूपखूप आभार. या सर्वांनी मागील अनेक वर्षांत मेहनतीचं काम केलं आहे. संघातील वातावरणही त्यांनी चांगलं ठेवले. ते आमच्या कुटुंबातील सदस्यच होते. भारतीय क्रिकेटच्या यशात त्यांचेही अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे.

... तर क्रिकेट खेळणं सोडून देईन... क्रिकेट खेळतानाची इंटेन्सिटी ( तीव्रता) तशीच कायम राहणार आहे, त्यात काही बदल होणार नाही. जर मी ती सोडली, तर मी क्रिकेट खेळूच शकत नाही. कर्णधार नव्हतो तेव्हाही बारकाईनं सामन्यावर लक्ष असायचं. त्यामुळे काहीच न करता उभं राहणं मला जमणार नाही, असेही विराटनं स्पष्ट केलं.

सूर्यकुमार यादवला संधी मिळावी म्हणून...विराट कोहलीनं आज तिसऱ्या क्रमांकावर स्वतः न येता सूर्यकुमार यादवला फलंदाजीला पाठवलं. त्या निर्णयामागचं कारण विराटनं स्पष्ट केलं. तो म्हणाला, सूर्यकुमारला या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुरेशी संधी मिळाली नाही. त्यामुळे इथे संधी देऊन त्याला चांगली आठवण सोबत घेऊन जाता येईल, असे मला वाटले. एक युवा खेळाडू म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेतून चांगल्या आठवणी घेऊन जायला नक्की आवडेल.  

आजच्या सामन्याचा निकाल...प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियानं धक्के बसूनही २० षटकं खेळून काढताना ८ बाद १३२ धावा केल्या. आर अश्विन ( ३-२०) व रवींद्र जडेजा  ( ३-१६ ) यांनी दमदार कामगिरी केली. रोहित शर्मानं भन्नाट कॅच घेतला. जसप्रीत बुमराहनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी ( ३९ धावा) व राहुल चहर ( ३० धावा) हे महागडे गोलंदाज ठरले. डेव्हिड विज ( २६) व स्टीफन बार्ड ( २१) यांनी संघर्ष दाखवला. प्रत्युत्तरात रोहित  व लोकेश राहुल यांनी वेगवान सुरुवात केली. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार मारून ५६ धावंवर माघारी परतला. राहुलनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. राहुल ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५४ धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सूर्यकुमार यादवनं १९ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. टीम इंडियानं १५.२ षटकांत १ बाद १३६ धावा केल्या.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१विराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादवरवी शास्त्री
Open in App