सिंगापूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चार दिवसांच्या वार्षिक आमसभेला चेअरमन जय शाह आणि सीईओ संजोग गुप्ता यांच्या उपस्थितीत गुरुवारी येथे सुरूवात होईल. आमसभेत द्विस्तरीय कसोटी प्रणाली आणण्यासह टी-२० विश्वचषकाचा विस्तार तसेच नव्या सहयोगी सदस्य देशांना मान्यता या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे.
डब्ल्यूटीसी २०२५-२७ हा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे संघांचे प्रमोशन (उत्कृष्ट संघ वर येतील) आणि रेलिगेशन (खराब खेळणारे संघ खाली जातील) ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय झाला, तरी तो २०२७ नंतरच अमलात येईल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लिश क्रिकेट बोर्ड या प्रणालीचे समर्थक आहेत.
टी-२० विश्वचषकामध्ये संघ वाढण्याची शक्यता
५० षटकांच्या विश्वचषकात संघांची वाढविण्याचा विचार नाही. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकात मात्र आणखी संघांची भर पडू शकते. ही संख्या २४ पर्यंत जाईल. मागच्या वर्षीच्या विश्वचषकात २० संघ खेळले होते.
२०२८ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये टी-२० चा समावेश झाल्यामुळे तसेच पुढच्या वर्षी भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी इटलीचा संघ पात्र ठरल्यामुळे संघांच्या विस्तारास बळ मिळाले.
झांबिया संघ पुन्हा सदस्य बनण्यास इच्छुक
मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान अवाढव्य खर्च झाला. याचा प्राथमिक अहवाल बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. पैशाचा अपव्यय झाल्यामुळे जानेवारीत सीईओ ज्योफ ॲलार्डिस यांनी पदाचा राजीनामा दिला होता. २०१९ ला झांबिया संघाला निलंबित करण्यात आले होते. हा संघ पुन्हा सहयोगी सदस्य बनण्यास इच्छुक आहे. पूर्व तिमोर संघानेदेखील सहयोगी सदस्यत्वासाठी अर्ज दिला आहे.
Web Title: T20 World Cup to be expanded; ICC General Assembly to begin today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.