अबुधाबी : माजी विजेत्या श्रीलंकेला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत अखेरच्या साखळी सामन्यात आज बुधवारी आयर्लंडविरुद्ध लढत द्यावी लागेल. विजयी संघ सुपर १२ मध्ये खेळण्यास पात्र ठरणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात क्रमश: नामीबिया आणि नेदरलॅन्ड संघांना प्रत्येकी सात गड्यांनी पराभूत केले असल्याने दोघांचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे.
लंकेने गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर नामीबियाला सहज पराभूत केले. आयर्लंडने नेदरलॅन्डवर प्रत्येक बाबतीत वर्चस्व सिद्ध केले. वेगवान कार्टिस कॅम्फर याने तर चार चेंडूंत चार बळी घेतले. आयर्लंडविरुद्ध आपली वाटचाल सोपी नसेल याची जाणीव लंकेचा कर्णधार दासून शनाका याला आहे. चुका टाळणारा संघ बाजी मारणार असल्याने लंकेला आघाडीच्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगावी लागेल. याशिवाय महेश थेकसाना आणि वानिंदु हसरंगा या दोन्ही फिरकीपटूंच्या यशावर लंकेचा विजय अवलंबून राहणार आहे. वेगवान गोलंदाजांकडूनही शनाकाला मोठ्या अपेक्षा असतील. दुसरीकडे आयर्लंडचे फलंदाज फिरकीपुढे नांगी टाकू शकतात.