टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत इंग्लंडनेपाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मैदानावरील चुरस आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. सामन्याचा निकाल लागताच स्टेडियममध्ये पाकिस्तानी आणि इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांच्या सेमीफायनलच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होते. मात्र, सामना संपल्यानंतर पाकिस्तानी चाहता आक्रमक झाला. याच चाहत्याने ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यातही राडा घातला होता. कालच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही चाहते एकमेकांवर ओरडत आहेत आणि धक्काबुक्की करत आहेत. अखेर श्रीलंकन प्रेक्षकांनी या दोघांना मध्यस्थी करत बाजुला केले.
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा वादाची ठिणगी:
क्रिकेट हा खेळाडूवृत्तीचा खेळ मानला जातो, पण अशा घटनांमुळे खेळाला गालबोट लागत आहे. या राड्यामुळे स्टेडियम परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानी चाहत्याने इंग्लंडच्या उंच धिप्पाड चाहत्याच्या शर्टला पकडले होते. जर ताबा सुटला असता किंवा हा वाद सोडविला नसता तर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी आता क्रीडाप्रेमींकडून होत आहे.