Join us  

T20 World Cup, OMNvPNG Live : ओमानची पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी; थेट ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी 

T20 World Cup, OMAN V PAPUA NEW GUINEA : ओमाननं T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 6:38 PM

Open in App

T20 World Cup, OMAN V PAPUA NEW GUINEA : ओमाननं T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पापुआ न्यू गिनीनं ( PNG) विजयासाठी ठेवलेले १३० धावांचे लक्ष्य ओमाननं ( OMN) एकही फलंदाज न गमावता १५ षटकांच्या आत पूर्ण केले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्मलेला जतिंदर सिंग ( JATINDER SINGH) व  अकिब इलियास ( Aqib Ilyas) हे या विजयाचे शिल्पकार ठरले. ओमाननं या विजयासह ऐतिहासिक कामगिरी केली आणि त्यांनी थेट ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. PNG चे दोन्ही सलामीवीर धावफलकावर दोन धावा असताना माघारी परतले. पहिल्या षटकात बिलाल खाननं PNGचा सलामीवीर टोनी उरा याचा त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात के कलीमुल्लाहनं PNGच्या लेगा स्लाकाची विकेट मिळवून २ बाद ० धावा अशी अवस्था केली. पण, कर्णधार अस्साद वाला व चार्ल्स आमिनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या. संवांद चुकल्यानं आमिनी ३७ ( २६ चेंडूं, ४ चौकार व १ षटकार) धावांवर धावबाद झाला. अस्सादनं ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. 

 डावाच्या १६व्या षटकात OMNचा कर्णधार झीशान मक्सूदनं तीन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर PNGनं २७ धावांत ६ फलंदाज गमावले आणि त्यांना २० षटकांत ९ बाद १२९ धावांवर समाधान मानावे लागले. झीशाननं २० धावांत ४  विकेट्स घेतल्या. बिलाल खान व के कलीमुल्लाह यांनी प्रत्येकी दोन बळी टीपले.  आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात एकाच सामन्यात एका संघाच्या कर्णधाराचे अर्धशतक व प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या चार विकेट्स असा पराक्रम प्रथमच घडला. 

प्रत्युत्तरात जतिंदर आणि अकिब या दोघांनीच ओमानला विजय मिळवून दिला. जतिंदर ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावांवर, तर अकिब ४३ चेंडूनं ५० धावांवर नाबाद राहिला. ओमाननं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत केवळ ऑस्ट्रेलिया ( वि. वि. श्रीलंक, २००७) व दक्षिण आफ्रिका ( वि. वि. झिम्बाब्वे, २०१२) या दोनच संघांना प्रतिस्पर्धींवर १० विकेट्स राखून विजय मिळवता आलेला आहे. आता ओमान त्यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आॅस्ट्रेलियाद. आफ्रिका
Open in App