T20 World Cup, Namibia vs Netherlands : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला पराभूत करून नामिबिया चर्चेत आला. पण, अ गटातील दुसऱ्याच सामन्यात नेदरलँड्सकडून हार मानावी लागली. नामिबियानेही अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना नामिबियाला ६ बाद १२१ धावांपर्यंत रोखले. त्यानंतर मुळचा पंजाबच्या विक्रमजीत सिंगने दमदार खेळ करताना नेदरलँड्सचा विजय निश्चित केला. या विजयासह ग्रुप अ मध्ये नेदरलँड्स ४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचले असून Super 12च्या दिशेने ही मोठी झेप आहे.
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाला ६ बाद १२१ धावा करता आल्या. जॅन फ्रायलिंकने ४३ धावांची उपयुक्त खेळी केली. सलामीवीर मिचेल व्हॅन लिंगेन ( २०), स्टीफन बार्ड ( १९), कर्णधार गेर्हार्ड इरास्मस ( १६) यांनी थोडेफार योगदान दिले. नेदरलँड्सच्या बॅस डे लीडने दोन विकेट्स घेतल्या. टीम प्रिंगल, कॉलिन आर्कमन, पॉल व्हॅन मिकेरेन व रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे यांनी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकी एक विकेट घेतली.
पंजाबमध्ये जन्मलेला १९ वर्षीय विक्रमजीत सिंगने नेदरलँड्सला धडाकेबाज सुरूवात करून दिली. मॅक्स ओ'डाऊडसह त्याने ६ षटकांत ५० धावा चढवल्या. नवव्या षटकात ही भागीदारी तुटली. विक्रमजीत ३१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर बाद झाला. मॅक्सने नंतर मोर्चा सांभाळताना ३५ धावांवर रन आऊट झाला. टॉम कूपरनही ६ धावा करून माघारी परतल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली. नेदरलँड्सला विजयासाठी २६ चेंडूंत २१ धावा हव्या असताना कूपरची विकेट पडली. जे स्मिथने तीन चेंडूंत दुसरी विकेट घेताना कॉलिन आर्कमनला शून्यावर माघारी जाण्यास भाग पाडले.
![]()
नेदरलँड्सला अखेरच्या ४ षटकांत २० धावाच करायच्या होत्या, परंतु नामिबिया अखेरपर्यंत झुंज देण्यास तयार होते. जान फ्रायलिंकने १६व्या षटकात एकही धाव न देता १ विकेट घेतली. आता डचना १८ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. नामिबियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या ८ षटकांत केवळ एकच चौकार मिळू दिला. १२ चेंडू १४ धावा असा सामना चुरशीचा झाला होता आणि १९व्या षटकात मिस फिल्ड, झेलचा अयशस्वी प्रयत्न अन् रन आऊटची हुकलेली संधी असे बरेच काही घडले. ६ चेंडूंत ६ धावा हव्या असताना बॅस डे लीडने चौकार खेचला. त्यानंतर विजयी दोन धावा करत नेदरल्ँडसचा ५ विकेट्स राखून विजय निश्चित केला. लीडने नाबाद ३० धावा केल्या.
अ गटातील चूरसनेदरलँड्सने ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. नामिबिया आज पराभूत झाले असले तरी पहिल्या सामन्यात श्रीलंकेला नमवल्याने त्यांच्या खात्यात २ गुण आहेत. श्रीलंकेला सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही ( वि. यूएई व वि. नेदरलँड्स) लढती मोठ्या फरकाने जिंकाव्या लागतील. नामिबियाचा शेवटचा सामना यूएईसोबत आहे आणि जर तो त्यांनी मोठ्या फरकाने जिंकला तर अ गटात तीन संघांच्या प्रत्येकी ४ गुण होतील आणि नेट रन रेट निर्णायक ठरेल.