दुबई : इंग्लंडवर विजय नोंदवून टी-२० विश्वचषकाची भक्कम तयारी करणारा भारतीय संघ आज बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा आणि अखेरचा सराव सामना खेळणार आहे. या सामन्याद्वारे मुख्य स्पर्धेसाठी फलंदाजी क्रम निश्चित करण्यावर भर दिला जाईल. स्पर्धेत भारताचा पहिला सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध असेल. कर्णधार आणि कोच या नात्याने विराट तसेच रवी शास्त्री यांची ही अखेरची स्पर्धा राहील.
सोमवारी इंग्लंडविरुद्ध विजय नोंदविण्याआधी कोहलीने सलामीला रोहित आणि राहुल तर पाठोपाठ आपण फलंदाजी करणार असे जाहीर केले होते. इंग्लंडविरुद्ध ७० धावा ठोकून युवा इशान किशन याने दावेदारी सादर केली. ऋषभ पंत याला देखील सूर्यकुमारच्या आधी फलंदाजीची संधी मिळाली होती. रोहितने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली नसल्याने बुधवारी कोण कोणत्या स्थानावर खेळेल यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. हार्दिक पांड्या मात्र चर्चेचा विषय आहे. इंग्लंडविरुद्ध तो सहज खेळला नाही. शिवाय गोलंदाजी करीत नसल्याने संघ व्यवस्थापन केवळ फलंदाज म्हणून त्याला खेळवेल? त्याला खेळविल्यास सहावा गोलंदाज कोण असेल? पाचपैकी एखादा गोलंदाज अपयशी ठरला तर? इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वरने एक गडी बाद केला. जसप्रीत बुमराह मात्र फॉर्ममध्ये दिसला. मोहम्मद शमीने तीन गडी बाद केले मात्र भरपूर धावा दिल्या तर राहुल चहरदेखील महागडा ठरला.
सध्याचा फॉर्म विचारात घेता मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमविणारा भारत सलग आठ मालिकांमध्ये अपराजित आहे. २०१६ च्या विश्वचषकानंतर भारताने जे ७३ टी-२० सामने खेळले त्यातील ४५ जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडला तीन गड्यांनी नमविले. डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्म मात्र येथेही कायम आहेच. तो काल पहिल्या चेंडूवर बाद झाला. ॲडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी चांगला मारा केला पण फलंदाजीत मधल्या फळीने दगा दिला. एश्टन एगर व मिशेल स्टार्क यांनी अखेरीस मौल्यवान धावा काढून संघाला विजय मिळवून दिला होता.