T20 World Cup, India vs Pakistan : क्रिकेटच्या मैदानावरील भारत-पाकिस्तान सामना संपला असला तरी मैदानाबाहेर अजूनही शाब्दिक फटाके फुटत आहेत. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यांच्यातले वाद जगजाहीर आहेत. आता त्यात आणखी एका गोलंदाजानं उडी मारली आहे. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर ( Mohammad Amir ) यानं पाकिस्तानच्या विजयानंतर भज्जीला डिवचले होते. तेव्हा भज्जी गप्प बसला होता, परंतु आता त्यानं शाहिद आफ्रिदीचं ( Shahid Afridi) नाव पुढे करून कळ काढल्यावर भारतीय गोलंदाजानं त्याची जाहीर लाज काढली.
मोहम्मद आमीरनं ट्विट केलं की, थोडा व्यग्र होतो. हरभजन सिंग तुझी गोलंदाजी पाहत होतो, जेव्हा लाला ( शाहिद आफ्रिदी)नं तुला चार चेंडूंत चार षटकार खेचले होते. क्रिकेटमध्ये होतं कधीकधी, परंतु कसोटीत हे जरा जास्तच झालं.'
आमीरच्या या ट्विटवर भज्जी खवळला. ''लॉर्ड्स कसोटीत नो बॉल कसे झाले होते? किती घेतलेस, कुणी दिले? कसोटी क्रिकेटमध्ये नो बॉल कसं टाकू शकतो?; लाज वाटली पाहिजे तुला आणि तुझ्या पाठीराख्यांना, जे या सुंदर खेळाला अपवित्र करत आहेत,''असे जोरदार प्रत्युत्तर भज्जीनं दिले.
त्यावर आमीरचा तोल ढासळला...
भज्जी इथेच थांबला नाही. त्यानं आणखी एक ट्विट केलं की,''मोहम्मद आमीर सारख्या लोकांना फक्त पैसा पैसा अन् पैसाच हवा असतो. आदर नकोय.. मग तुझ्या देशवासियांना आणि पाठीराख्यांना हे सांगून टाक की तुला किती पैसा मिळाला होता. तुझ्यासारख्या लोकांच्या तोंडाला लागण्याचीही माझी इच्छा नाही.''