दुबई : कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सलग दुसरा सराव सामना जिंकताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमविले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ५ बाद १५२ धावांत रोखल्यानंतर भारतीयांनी १७.५ षटकांत केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले.
पहिल्या सराव सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहितने शानदार अर्धशतकासह फलंदाजीचा सराव केला. त्याने ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा फटकावल्या. त्याच्यासह लोकेश राहुलने डावाची सुरुवात केल्याने, पाकिस्तानविरुद्ध रोहित-राहुल हीच सलामीची जोडी असेल, हे जवळपास निश्चित
झाले आहे. राहुलनेही ३१ चेंडूंत ३९ धावा करीत रोहितला चांगली साथ दिली. दोघांनी ६८ धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया उभारला. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने २७ चेंडूंत नाबाद ३८, तर हार्दिक पांड्याने ८ चेंडूंत नाबाद १४ धावा करीत भारताचा विजय साकारला. ऑस्ट्रेलियाला भारतीय फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. एश्टन एगरने एक बळी घेतला. रोहितने रिटायर्ड आऊट होत पुढील फलंदाजांना संधी दिली.
त्याआधी, अश्विनच्या धक्क्यांमुळे आघाडीची फळी कोलमडल्याने ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिले तीन फलंदाज एकेरी धावांत बाद झाल्याने त्यांची ३ बाद ११ धावा अशी अवस्था झाली. यानंतर स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
स्मिथ-मॅक्सवेलची झुंज
आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या स्मिथने ४८ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ धावा काढत चांगला सराव करून घेतला.
मॅक्सवेलने आयपीएलमधील फॉर्म कायम असल्याचे दाखवत २८ चेंडूंत ५ चौकारांसह ३७ धावा केल्या.
यानंतर मार्कस स्टोइनिसने २५ चेंडूंत नाबाद ४१ धावांचा तडाखा दिल्याने ऑस्ट्रेलियाला दीडशेचा पल्ला पार करता आला.
अश्विनने २, तर भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा व राहुल चहर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या सराव सामन्यात अत्यंत महागडा ठरलेल्या भुवनेश्वरने यावेळी कमालीची सुधारणा करीत भारतीयांना दिलासा दिला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ५ बाद १५२ धावा (स्टीव्ह स्मिथ ५७, मार्कस स्टोइनिस नाबाद ४१, ग्लेन मॅक्सवेल ३७; रविचंद्रन अश्विन २/८, राहुल चहर १/१७, भुवनेश्वर कुमार १/२७, रवींद्र जडेजा १/३५.) पराभूत वि.
भारत : १७.५ षटकांत २ बाद १५३ धावा (रोहित शर्मा ६०, लोकेश राहुल ३९, सूर्यकुमार यादव नाबाद ३८; एश्टन एगर १/१४.)