T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलने चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु दुसऱ्याच षटकात त्याची विकेट पडली. विराट कोहलीही थोडक्यात वाचला. खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर विराटने दमदार खेळ करण्यास सुरुवात केली. ज्या वोक्सने भारताला धक्का दिला, त्यालाच पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचला. विराटची फटकेबाजी पाहून रोहित शर्मानेही आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली. या सामन्यात विराटने आतापर्यंत कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम नोंदवला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. एडिलेड येथे आतापर्यंत झालेल्या ११ ट्वेंटी-२० सामन्यांत नाणेफेक जिंकलेल्या संघाला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजचा नाणेफेकीचा कौल हा भारतासाठी शूभसंकेत आहे असे म्हणायला हवं. लोकेश राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून चाहत्यांना खूश केले. इंग्लंडने आज बेन स्टोक्सकडून पहिली ओव्हर करून घेत आश्चर्याचा धक्का दिला. मार्क वूडच्या माघारीमुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. लोकेशने ज्या प्रकारे सुरुवात केली, त्यात त्याला सातत्य राखता आले नाही. ख्रिस वोक्सने दुसऱ्या षटकात लोकेशला ( ५) बाद केले.
उसळी घेणारा बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर लोकेशने फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाने सोपा झेल घेतला. सॅम कुरनने टाकलेल्या तिसऱ्या षटकात विराट कोहलीच्या बॅटीला लागून चेंडू पहिल्या स्लीपच्या दिशेने गेला, परंतु मोईन अली झेल घेण्याआधी चेंडू पुढे पडला. वोक्सच्या पुढच्याच षटकात विराटने मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. विराट व रोहित ही जोडी इंग्लंडचा संयमाने सामना करताना दिसली.
रोहितने पाचव्या षटकात गिअर बदलला आणि कुरनला सलग दोन चौकार खेचले. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर रोहितचा झेल उडाला होता, परंतु रशीदपासून चेंडू थोडा दूरच पडला. भारताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ३८ धावा केल्या. दरम्यान, विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ११००+ धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा विक्रम नोंदवला.
![]()
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"