T20 World Cup, Group Standing : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आजचे दोन्ही सामने थरारर झाले. गतविजेत्या वेस्ट इंडिजनं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर विजय मिळवला, तर अफगाणिस्तानचे कवडे आव्हान परतवून लावताना पाकिस्तानं विजयाची हॅटट्रिक साजरी केली. पाकिस्ताननं या विजयासह Group 2 मधून उपांत्य फेरीची दावेदारी निश्चित केली आहे, पण वेस्ट इंडिजच्या विजयानं Group 1 मधील समीकरण बिघडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत..
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश ( WEST INDIES V BANGLADESH ) गतविजेत्या वेस्ट इंडिजचेट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक ठरलेल्या लढतीत वेस्ट इंडिजनं ३ धावांनी बाजी मारली. बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह व लिटन दास यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आंद्रे रसेलच्या अखेरच्या षटकानं त्यांना हार मानण्यास भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रसेलनं त्याचा सर्व अनुभव एकवटून सुरेख चेंडू टाकला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना रोस्टन चेस ( ३९) व निकोलस पूरन ( ४०) यांच्या खेळीच्या जोरावर ७ बाद १४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दास ( ४४) व महमुदुल्लाह ( ३१*) यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना ५ बाद १३९ धावाच करता आल्या.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान ( PAKISTAN V AFGHANISTAN)आसिफ अलीनं १९व्या षटकात ४ षटकार खेचून पाकिस्तानला ५ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४७ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद नबी व गुलबदीन नैब यांनी प्रत्येकी नाबाद ३५ धावा केल्या. नजिबुल्लाह जाद्राननं २२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार बाबर आजमनं ५१ व फाखर जमाननं ३० धावांची खेळी करून पाकिस्तानचा डाव सारवला. आसिफनं ७ चेंडूंत नाबाद २५ धावा करून पाकिस्तानचा विजय पक्का केला.
ग्रुप १या गटात इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे प्रत्येकी ४ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शनिवारी उभय संघ एकमेकांना भिडणार आहेत आणि त्यातील विजेता हा अव्वल स्थानासह या गटातून उपांत्य फेरीकडे कूच करेल. विंडीजच्या आजच्या विजयानं या गटात फार फरक पडणार नाही. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण असले तरी विंडचे तीन सामने झाले आहेत. प्रत्येकी दोन सामने खेळणाऱ्या आफ्रिका व श्रीलंकेला अजून संधी आहे, परंतु त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. श्रीलंकेसमोर आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आहेत, तर आफ्रिकेसमोर श्रीलंका, बांगलादेश व इंग्लंड यांचे आव्हान आहे.