दुबई : टी-२० या क्रिकेटच्या वेगवान प्रकारात दबदबा राखून असलेला वेस्ट इंडिज संघ सराव सामन्यांमध्ये अडखळताना दिसला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यांतील निराशाजनक कामगिरीनंतर विंडीजच्या क्षमतेवर शंका निर्माण होत आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंडसारखा तगडा आणि फॉर्ममध्ये असलेला संघ असल्याने विंडीजला विजयी सलामीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.
विंडीज संघाकडे एकाहून एक सरस असे आक्रमक आणि स्फोटक फलंदाज आहेत. मात्र, दोन्ही सराव सामन्यांत ढेपाळलेली फलंदाजी पाहता इंग्लंडचे पारडे वरचढ दिसत आहे. किएरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाला केवळ कामगिरीच नव्हे, तर आत्मविश्वासही उंचवावा लागेल.
उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी वेस्ट इंडिजसाठी पोलार्डसह, एविन लुईस, लेंडल सिमन्स, शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांचे फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे; पण त्यासाठी त्यांना एकावेळी एका सामन्याचाच विचार करून त्यानुसार योजना आखाव्या लागतील.
दुसरीकडे, इंग्लंड चांगल्या फॉर्ममध्ये असून २०१६ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यात विंडीजविरुद्ध झालेला पराभव विसरून ते मोहिमेला सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरेन यांच्या अनुपस्थितीतही इंग्लंड संघ संतुलित दिसतोय. जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो आणि जोस बटलर या आक्रमक फलंदाजांवर इंग्लंडची मुख्य मदार असून मोइन अलीच्या रूपाने त्यांच्याकडे विस्फोटक अष्टपैलू आहे. गोलंदाजीत मार्क वूड, आदिल रशीद, मोइन, डेव्हिड विली आणि ख्रिस वोक्स हे विंडीजला रोखू शकतील.
युनिव्हर्सल बॉस हा एकटा विंडीजला विजयी करू शकेल. मात्र, याचा हरपलेला फॉर्म सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगसोबतच आयपीएलमध्येही तो छाप पाडू शकला नव्हता. शिवाय अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल अद्याप दुखापतग्रस्त आहे.