Join us  

टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन यूएईत ?

वैद्यकीय तज्ज्ञांनी सप्टेंबरमध्ये भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात सध्या स्थिती वाईट आहे. गेल्या काही दिवसांत रोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 2:21 AM

Open in App

नवी दिल्ली : यंदा भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन आता यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय क्रिकेट बोर्डला (बीसीसीआय) वाटते की, यावेळी कुठल्याही संघाला भारतात येताना सहज वाटणार नाही. याबाबतचा अंतिम निर्णय १ महिन्यात होईल; पण मिळालेल्या माहितीनुसार जैवसुरक्षित वातावरणातही (बायो बबल) कोविड-१९ चे काही रुग्ण आढळल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) स्थगित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयसुद्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या १६ संघांच्या या स्पर्धेचे आयोजन करण्याचे टाळत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची अलीकडेच केंद्र सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यावर बऱ्याच अंशी एकमत झाले. या स्पर्धेतील लढती नऊ स्थळांवर खेळल्या जाणार होत्या. त्याबाबत अद्याप घोषणा झालेली नव्हती.बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आयपीएल चार आठवड्यांत स्थगित होणे याचे संकेत आहे. देश गेल्या ७० वर्षांत आपल्या सर्वांत वाईट स्वास्थ्य संकटाला सामोरे जात आहे. अशा वेळी जागतिक स्पर्धेचे यजमानपद भूषविणे वास्तविकदृष्ट्या सुरक्षित नाही. भारतात नोव्हेंबरमध्ये (कोविड-१९) तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय यजमान राहील; पण स्पर्धा शक्यतो यूएईमध्ये आयोजित करण्यात येईल.’

वैद्यकीय तज्ज्ञांनी सप्टेंबरमध्ये भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात सध्या स्थिती वाईट आहे. गेल्या काही दिवसांत रोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत; त्यामुळे अनेक क्रिकेट बोर्ड चिंतेत आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांच्या सुरक्षेबाबत जोखीम पत्करणार नाही. एका अन्य सूत्राने सांगितले, ‘जर परिस्थिती सामान्य झाली नाही तर पुढील सहा महिने कुठलाही देश भारताचा दौरा करण्यास उत्सुक राहणार नाही. आणखी एक लाट आली तर खेळाडू व त्यांचे कुटुंबीय सावध असतील. त्यामुळे बीसीसीआय स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यावर सहमत होईल, अशी आशा आहे.’

आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. जूनमध्ये आयसीसीची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होईल; पण आयपीएल स्थगित झाल्यानंतर भारतात स्पर्धेच्या आयोजनाची शक्यता धूसर झाली आहे.

टॅग्स :टी-20 क्रिकेटदुबई