अल अमिरात : ओमानविरुद्ध विजयामुळे विजय पथावर परतलेल्या बांगलादेशला टी-२० विश्वचषकात ब गटाच्या साखळी सामन्यात गुरुवारी पापुआ न्यूगिनीविरुद्ध (पीएनजी) कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. स्कॉटलंडकडून सहा धावांनी पराभवाचा सामना करावा लागल्याने बांगलादेश अडचणीत आला होता, मात्र मंगळवारी महमुदुल्लाहच्या नेतृत्वाखालील या संघाने ओमानला २६ धावांनी पराभूत केले. आता सुपर-१२साठी पीएनजीवर विजय मिळविणे क्रमप्राप्त झाले आहे.
बांगलादेश गटात तिसऱ्या स्थानी असून, त्यांची धाव सरासरी ०.५०० इतकी आहे. पीएनजीवर विजय मिळाल्यास दोन गुण मिळतील. नंतर ओमानविरुद्ध स्कॉटलंडने जिंकावे, अशी त्यांना प्रार्थना करावी लागेल. स्कॉटलंडने दोन्ही सामने जिंकून सुपर-१२मध्ये स्थान निश्चित केले. बांगलादेशच्या जमेची बाब अशी की, त्यांचे प्रमुख फलंदाज फॉर्ममध्ये परतले आहेत. तरीही मधल्या फळीचे अपयश त्यांच्या चिंतेचा विषय ठरू शकतो. मेहदी हसन, कर्णधार महमुदुल्लाह, नुरुल हसन आणि आफीक हुसेन यांना धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. अष्टपैलू शाकिब अल हसन याची भूमिकादेखील निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात बांगलादेश संघ अंतिम एकादशमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे.