टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात अवघ्या २६ चेंडूत ४५ धावांची वादळी खेळी करत रझाने झिम्बाब्वेला दणदणीत विजय मिळवून दिला. या कामगिरीसह त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सिकंदर रझाने वयाच्या ३९ वर्षे ३०१ दिवसांच्या वयात हा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. यासह तो आयसीसी स्पर्धेत सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये वयाच्या ३७ वर्षे ३३१ दिवशी हा बहुमान मिळवला होता. आता रझाने हा मान मिळवून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला आहे.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा रझा आता दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्या (३९ वर्षे ३४५ दिवस) असून, तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शोएब मलिक (३९ वर्षे २७९ दिवस) आहे.
झिम्बाब्वेचा दणदणीत विजय
श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने २० षटकांत ७ गडी गमावून १७८ धावा केल्या. श्रीलंकेकडून पथुम निस्सांकाने शानदार अर्धशतक झळकावले, त्याने ४१ चेंडूत ६२ धावा केल्या. ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या आणि रायन बर्ल आणि सिकंदर रझाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने हे लक्ष्य सहज गाठले. बेनेटने ४८ चेंडूत ६३ धावा केल्या, तर बर्लने १२ चेंडूत २३ धावा केल्या.