Join us
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वेचा 'हा' फलंदाज ठरलाय गोलंदाजांसाठी कोडं; ३ सामने झाले, पण कुणीही करू शकले नाही 'आऊट'!

T20 World Cup 2026: भल्याभल्या फलंदाजांच्या विकेट्स जात आहेत, पण झिम्बाब्वेच्या 'या' पठ्ठ्याला आऊट करणं अद्याप कुणालाच जमलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:37 IST

Open in App

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. साखळी फेरीतील तीनही सामने जिंकत झिम्बाब्वेने आपली ताकद सिद्ध केली आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ अद्याप अपराजित आहे. झिम्बाब्वेच्या यशात संघात सलामीवीर ब्रायन बेनेट याचा मोलाटा वाटा आहे.  बेनेट संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला असून तो अद्याप एकदाही बाद झालेला नाही.

ब्रायन बेनेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने ओमानविरुद्ध नाबाद ४८ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध ६३ धावांची नाबाद खेळी साकारली. या कामगिरीमुळे चालू स्पर्धेत कोणत्याही गोलंदाजाला त्याला बाद करण्यात यश आले नाही. यंदाच्या टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेट हा सर्वात मोठा नायक ठरला असून त्याची कामगिरी संघाच्या भविष्यासाठी अत्यंत आशादायी मानली जात आहे.

२२ वर्षीय बेनेट सध्या झिम्बाब्वेच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. त्याने २०२२ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात झिम्बाब्वेसाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. सहा सामन्यांत ४५.५० च्या सरासरीने २७३ धावा करत तो संघाचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरला. अवघ्या दहा महिन्यांत त्याने माउंटेनियर्सकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्पेन्सर मॅगोडोच्या दुखापतीनंतर त्याला संधी मिळाली. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत ४१ धावांची झंझावाती खेळी केली. त्यानंतर त्याचा प्रवास अधिक वेगाने पुढे सरकला आणि ७ डिसेंबर २०२३ रोजी आयर्लंडविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

बेनेटने आतापर्यंत झिम्बाब्वेसाठी ११ कसोटी, ११ एकदिवसीय आणि ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २९.९४ च्या सरासरीने ५०९ धावा करत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्याने ३१.६३ च्या सरासरीने ३४८ धावा केल्या असून त्यात एका शतकाचा समावेश आहे. 

दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र त्याची कामगिरी विशेष ठरली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३५.४२ ची सरासरी आणि १४३.१६ चा स्ट्राइक रेटने १ हजार ७७१ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीसोबतच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ विकेट्सही घेतल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Zimbabwe's Bryan Bennett: Unbreakable batsman in T20 World Cup.

Web Summary : Bryan Bennett's stellar performance in the T20 World Cup has made him a standout player for Zimbabwe. Undefeated in three matches, Bennett's consistent scoring and dynamic play are pivotal to Zimbabwe's success and future prospects. His journey from U-19 cricket to international stardom showcases his talent.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६झिम्बाब्वे