आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता निर्णायक वळणावर आला आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. मात्र, या हायव्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास किंवा सामना रद्द झाल्यास अंतिम फेरी कोण गाठणार? हे ठरवण्यासाठी आयसीसीचा नियम गेंमचेंजर ठरणार आहे.
चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आयसीसीने नॉक आउट फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. ५ मार्च रोजी नियोजित असलेल्या या सामन्यात पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर, ६ मार्च रोजी सामना पुन्हा सुरू केला जाईल. निकाल निश्चित करण्यासाठी पहिल्या दिवशी अतिरिक्त ९० मिनिटे आणि राखीव दिवशी १२० मिनिटांचा वेळ मिळतो.
महत्त्वाचे म्हणजे, टी-२० सामन्यात ५-५ षटकांचा खेळ झाल्यास निकाल घोषित केला जातो. मात्र, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी नियम अधिक कडक आहेत. सामन्याचा अधिकृत निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी किमान १० षटके खेळणे अनिवार्य आहे. जर पावसाने १० षटकांचाही खेळ होऊ दिला नाही, तरच सामना रद्द समजला जाईल. जर ५ आणि ६ मार्च या दोन्ही दिवशी पावसाचा जोर कायम राहिला तर, सुपर ८ टप्प्यातील क्रमवारी निर्णायक ठरेल.
कुणाचे सर्वाधिक नुकसान?
इंग्लंडचा संघ सुपर ८ च्या ग्रुप २ मध्ये पहिल्या स्थानावर राहिला. तर, टीम इंडिया सुपर ८ च्या ग्रुप १ मध्ये दुसऱ्या स्थानावर होता. जर सामना पूर्णपणे रद्द झाला, तर गुणतालिकेतील अव्वल स्थानामुळे इंग्लंड थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगेल.