Join us
Daily Top 2Weekly Top 5

NZ vs PAK: पाकिस्तान- न्यूझीलंड सामना रद्द झाल्यास सेमीफायनलचं गणित कसं बदलणार? 'या' २ संघाचं होणार मोठं नुकसान!

T20 World Cup 2026 Super 8 Match: पाकिस्तान आणि न्यूझीलंड सुपर ८ सामन्यावर पावसाचे सावट असून हा सामना रद्द झाल्यास सेमीफायनलचे समीकरण बदलण्याची शक्यता असून दोन संघाचे नुकसान होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:35 IST

Open in App

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ फेरीत आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील महत्त्वाचा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणार आहे. सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मात्र, या रोमांचक लढतीवर पावसाचे सावट असल्याने क्रिकेट चाहत्यांची धडधड वाढली आहे. या स्पर्धेत झिम्बाव्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर स्पर्धेतील समीकरण बदलल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आज खेळला जाणारा सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाचे नुकसान होणार? हे जाणून घेऊयात.

या स्पर्धेतील साखळी फेरीत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना गमावला असला तरी चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी सुपर-८ मध्ये प्रवेश केला. न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेकडून, तर पाकिस्तानला भारताकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. या गटात इंग्लंड आणि श्रीलंका हे अन्य दोन बलाढ्य संघ असल्याने गुणतालिकेतील प्रत्येक गुण मोलाचा आहे. जर आजचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. मात्र, ज्याचा नेट रनरेट कमी असेल त्याला अधिक फटका बसू शकतो. एका गुणावर समाधान मानावे लागल्यास पुढील दोन्ही सामने जिंकणे दोन्ही संघासाठी आवश्यक असेल. विशेषतः इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धची लढत अधिकच आव्हानात्मक बनले.

हवामान खात्याचा  रिपोर्ट काय सांगतो? 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २१ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची ७५ टक्के शक्यता आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत हवामान अधिक खराब राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असल्याने त्या वेळी पावसाची शक्यता तुलनेने कमी असली तरी अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चाहत्यांची नजर आकाशाकडे

क्रिकेटप्रेमींची नजर आता आकाशाकडे लागली आहे. दोन्ही संघ विजयासाठी सज्ज असताना पावसाने खेळ बिघडवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. कारण या सामन्याचा निकाल सुपर-८ गटाचे चित्र पूर्णपणे बदलू शकतो.आजची लढत केवळ दोन संघांमधील नाही, तर सेमीफायनलकडे वाटचाल करणाऱ्या स्वप्नांची आहे. आता पाहावे लागेल की मैदानावर कोण बाजी मारते आणि पाऊस किती अडथळा ठरतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Rain threat looms over Pakistan-New Zealand match; Semifinal chances at stake.

Web Summary : Crucial Pakistan-New Zealand T20 World Cup match faces rain threat. A washout impacts semifinal hopes, especially for teams with lower net run rates. Both teams need to win remaining matches, particularly against England and Sri Lanka, to stay in contention.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६न्यूझीलंडपाकिस्तान