Wanindu Hasaranga Ruled out T20 World Cup 2026: टी२० विश्वचषक २०२६ चा सह-यजमान असलेल्या श्रीलंकन संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू आणि मॅचविनर अष्टपैलू वानिंदू हसरंगा याला 'हॅमस्ट्रिंग'च्या (Hamstring) गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. हसरंगाला ही दुखापत आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात झाली होती. त्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते आणि श्रीलंकेला २० धावांनी विजय मिळवून दिला होता. मात्र, गोलंदाजी दरम्यानच त्याला त्रास जाणवू लागला होता. अखेर त्याने स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
MRI रिपोर्टमध्ये काय खुलासा?
मंगळवारी करण्यात आलेल्या एमआरआय (MRI) स्कॅनमध्ये त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये मोठी 'टीअर' (Tear) असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुखापत गंभीर असल्याने त्याला सावरण्यासाठी अनेक आठवडे लागणार आहेत. हसरंगा हा टी२० विश्वचषकाच्या इतिहासात श्रीलंकेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. घरच्या मैदानावरील फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर तो श्रीलंकेचे सर्वात मोठे शस्त्र होता, परंतु आता यजमानांना त्याच्याविनाच पुढील प्रवास करावा लागेल.
बदली खेळाडूची घोषणा?
वानिंदू हसरंगाच्या जागी श्रीलंकन संघात लेग-स्पिनर दुषण हेमंथा (Dushan Hemantha) याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. हेमंथा हा देखील एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, तांत्रिक समितीच्या मंजुरीनंतर ही बदली अधिकृत केली जाईल. हसरंगाच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेच्या फिरकी आक्रमणाची मदार आता महीश तीक्षणा आणि वानिंदूच्या जागी येणाऱ्या युवा खेळाडूंवर असेल.