T20 World Cup 2024 : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानला ट्वेंटी-२० मालिकेत ०-२ असा दारूण पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले. दोन सामने खेळले गेले पण त्यात शेजाऱ्यांना विजय मिळवता आला नाही. सततच्या पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते आपल्या संघावर टीका करत आहेत. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे. पाकिस्तान ६ जून रोजी अमेरिकेविरूद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.
मोहसिन नक्वी म्हणाले की, मी चाहत्यांना विनंती करतो की, पुढचे चार आठवडे कृपया आपल्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवा. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने हार जीत होत असते हे समजून आपल्या संघाच्या पाठिशी उभे राहायला हवे. ते विजयाच्या इराद्याने अमेरिकेला गेले आहेत ते नक्कीच विश्वचषक जिंकून येतील. त्यामुळे कृपया करून पुढचे चार आठवडे त्यांच्यावर टीका करू नका. पीसीबी अध्यक्ष नक्वी हे लंडन येथे डिनर रिसेप्शनदरम्यान बोलत होते.
पाकिस्तानचा दारूण पराभव
इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेहमीप्रमाणे पाकिस्तानने संथ गतीने धावा केल्या. यावेळी शेजाऱ्यांना निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ १९.५ षटकांत अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. पाकिस्तानने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सहज विजय साकारला. अवघ्या १५.३ षटकांत १५८ धावा करून यजमानांनी २-० ने मालिका खिशात घातली. फिल साल्टने २४ चेंडूत ४५ धावांची स्फोटक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर कर्णधार जोस बटलरने ३९ धावा केल्या.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -
६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास
९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ