Join us

Nitish Kumar 'किंग'मेकर! अमेरिकेने इतिहास रचला, पाकिस्तानला Super Over मध्ये केले पराभूत

जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फौज असलेल्या पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेने पराभवाचे पाणी पाजले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 01:18 IST

Open in App

T20 World Cup 2024 PAK vs USA Live : जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फौज असलेल्या पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेने पराभवाचे पाणी पाजले. यजमान अमेरिकेने Super Over मध्ये अनपेक्षित निकाल नोंदवला. अ गटातील अमेरिकेचा हा सलग दुसरा विजय ठरल्याने ते ४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचले आहेत आणि त्यांच्या Super 8 च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सामन्यात Nitish Kumar कुमार गेमचेंजर ठरला.. शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून त्याने सामना सुपर ओव्हरमध्ये नेला आणि नंतर अफलातून झेल घेऊन अमेरिकेचा विजय पक्का केला. 

कर्णधार मोनांक पटेल व अँड्रीस गौस ( ३६) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडले. त्यांनी ६८ धावांची भागीदारी केली. मोनांक ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. शाहीन आफ्रिदी व मोहम्मद आमीर यांनी चांगला मारा करून शेवटच्या षटकात १५ धावा अमेरिकेसाठी ठेवल्या होत्या. नितीश कुमार व आरोन जोन्स यांनी अमेरिकेला आशेचा किरण दाखवला. ३ चेंडूंत १२ धावा हव्या असताना जोन्सने खणखणीत षटकार खेचला. पण, पुढच्या चेंडूवर १ धाव घेतली आणि नितीशने चौकार खेचून सुपर ओव्हरमध्ये सामना नेला. अमेरिकेने ३ बाद १५९ धावा करून सामना बरोबरीत आणला. जोन्स २६ चेंडूंत ३६ धावांवर , तर नितीश कुमार १४ धावांवर नाबाद राहिला. 

तत्पूर्वी, नोस्तुश केंजिगे ( २-३०), मुळचा मुंबईचा सौरभ नेत्रावळकर ( २-१८), अली खान ( १-३०) व जसदीप सिंग ( १-३७) यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची कोंडी केली. ३ बाद २६ अशा अवस्थेतून पाकिस्तानला बाबर आजम व शादाब खान यांनी सावरले. त्यांनी ४८ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. शादाब २५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांवर बाद झाला. बाबरने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा केल्या. इफ्तिखार अहमदच्या १८ आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या नाबाद २२ धावांमुळे पाकिस्तान ७ बाद १५९ धावांपर्यंत कसाबसा पोहोचला.  

 Super Over चा थरार..मोहम्मद आमीरवर सुपर ओव्हरची जबाबदारी दिली गेली, परंतु आरोन जोन्सने पहिलाच चेंडू चौकार खेचला. त्यानंतर २,१ अशा धावा मिळाल्या. आमीरच्या ३ व्हाईड चेंडूंवर अमेरिकेच्या फलंदाजांनी प्रत्येकी १ धाव पळून काढली. त्यात गचाळ क्षेत्ररक्षणाने पाकिस्तानचा पुन्हा घात केला. तिसऱ्या व्हाईड चेंडूवर अमेरिकेने दोन धावा पळून काढल्या. अमेरिकेने १८ धावा करून पाकिस्तानसमोर १९ धावांचे लक्ष्य ठेवले. 

सौरभ नेत्रावळकरने पहिला चेंडू निर्धाव फेकला, परंतु इफ्तिखार अहमदने दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला. त्यामुळे सौरभचा पुढचा चेंडू व्हाईड गेला, परंतु तिसऱ्या चेंडूवर नितीश कुमारने अफलातून झेल घेतला. सौरभने यॉर्करच्या प्रयत्नात व्हाईड फेकला. पुढच्या चेंडूवर चौकार मिळाल्याने सामना २ चेंडूंत ९ धावा असा आला. दोन धावा आल्याने १ चेंडू ७ धावा असा सामना आला. शेवटच्या चेंडूवर १ धाव आल्याने अमेरिकेने हा सामना जिंकला. पाकिस्तानला १३ धावाच करता आल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तानअमेरिका